Join us

Sericulture Farming : 12 बॅचेस, वर्षाला दहा लाखांचे उत्पन्न, वर्ध्याच्या युवा शेतकऱ्याची रेशीम शेती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 16:55 IST

Sericulture Farming : विद्याधर खोडे हे पूर्वी शेतामध्ये कापूस, सोयाबीन व तूर अशा पारंपरिक पिकांची लागवड करून उत्पादन घेत होते.

- आनंद इंगोले

वर्धा : निसर्गाचा लहरीपणा तर कधी अस्मानी-सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिसकावून घेतले जात होते. यामुळे पारंपरिक पीक पद्धतीला बगल देऊन रेशीम शेतीला (Sericulture Farming) सुरुवात केली. बघता-बघता या शेतीतून शेतकऱ्याला दहा लाखांचे भरघोस उत्पादन झाल्याने युवा शेतकरी लखपती झाला. आजच्याघडीला त्यांच्याकडे १२ बॅचेस असून त्यामधून विद्याधर खोडे हे १० लाखांचे वार्षिक उत्पन्न घेत आहे.

वर्धा जिल्ह्यातील (Wardha District) आर्वी तालुक्यातील आर्वी छोटी येथील युवा शेतकरी विद्याधर खोडे हे पूर्वी शेतामध्ये कापूस (Cotton Crop), सोयाबीन व तूर अशा पारंपरिक पिकांची लागवड करून उत्पादन घेत होते. परंतु हंगामाअखेर खर्च वजा जाता हाती काहीच शिल्लक राहत नव्हते. त्यानंतर त्यांनी या पीक पद्धतीत बदल करावा म्हणून त्यांनी भाजीपाला घ्यायला सुरुवात केली. परंतु अनेकदा अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचेही (Vegetable Crop) मोठे नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. 

अखेर त्यांनी भोजराज खोडे व अरुण जगताप यांच्याकडून रेशीम शेतीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर सन २०२१-२२ मध्ये मनरेगा अंतर्गत तुती लागवड करून रेशीम शेती करण्यास सुरुवात केली. पहिल्याच वर्षी पहिल्या पिकामध्ये त्यांना ९५ किलो कोष उत्पादन करून निव्वळ नफ्यामधून ५५ हजार रुपयांमध्ये कोष विक्री केली. कच्चे ताडपत्रीचे कीटक संगोपनातून विक्रमी कोष उत्पादन करून नफा मिळविला. मनरेगा योजनेमधून त्यांनी पक्के कीटक संगोपनगृह बांधकाम करून ४ ते ५ बॅचेसमधून प्रत्येक बॅचेसला ८० ते ९० हजार रुपयांचा आर्थिक मोबदला कमवीत आहेत. आजच्या घडीला त्यांच्याकडे १२ बॅचेस असून त्यामधून विद्याधर खोडे हे १० लाखांचे वार्षिक उत्पन्न घेत आहे.

इतर शेतकऱ्यांनाही मिळाली प्रेरणायुवा शेतकरी विद्याधर खोडे यांनी पारंपरिक पिकांच्या अनुभवातून रेशीम शेतीची कास धरली. या शेतीकरिता त्यांना मनरेगा योजनेतून मोठे आर्थिक साहाय्य मिळाल्याने त्यांचा शेती करण्याचाही दृष्टिकोन बदलला. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ झाली असून आता ते इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करीत आहेत. परिणामी इतर शेतकऱ्यांनाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळत आहे.

 

टॅग्स :रेशीमशेतीशेती क्षेत्रवर्धाशेती