Join us

बीए, डीएड पदवीधर शिक्षकाचा प्रेरणादायी शेती प्रवास; ६५ दिवसांत कोबी पिकातून नऊ लाख रुपयांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:02 IST

Agriculture Success Story : नोकरी काय करायची, त्यात मन न रमल्याने चक्क नोकरी सोडून शेतीचा रस्ता धरणाऱ्या रुधाणा (ता. खामगाव) येथील शिक्षकाची यशगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

सदानंद  शिरसाट

सद्यस्थितीत सरकारी किंवा खासगी नोकरीच्या मागे लागून अनेकांच्या उमेदीचा काळ संपून जातो. त्यानंतर सुरुवात केल्यास खूप उशीर होतो. त्यातही नोकरी म्हणजे आखीव-रेखीव कामच.

त्यामुळे नोकरी काय करायची, त्यात मन न रमल्याने चक्क नोकरी सोडून शेतीचा रस्ता धरणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या रुधाणा (ता. संग्रामपूर) येथील शिक्षकाची यशगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

संग्रामपूर तालुक्यातील रुधाणा गावात या कथेचे मूळ आहे. गावातील महादेव पांडुरंग उकळकार यांच्या समाधान नामक मुलाने शेतीचा रस्ता धरत त्यामध्ये नवीन प्रयोग करून उत्पन्न मिळवण्याचा मार्ग तयार केला आहे.

मुलाने मोठ्या कष्टाने बहरलेल्या शेतात महादेव पांडुरंग उकळकार.

बीए., डीएड असलेल्या समाधानला खेर्डा गावातील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी लागली. मात्र, त्यात मन रमले नाही. त्यामुळे राजीनामा देत शेती करणे सुरू केले आहे.

९ लाखांचे उत्पन्न!

• उकळकार यांनी केवळ ६५ दिवसांत २.५ एकरात कोबीचे तब्बल नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे उदाहरणही घालून दिले आहे. कोबीचे उत्पन्न केळी पिकातून घेतले, हे विशेष.

• आधीच असलेल्या केळी पिकात आंतरपीक म्हणून त्यांनी पत्ता कोबीची लागवड केली. त्याला १.५ लाख रुपये खर्च आला. हा खर्च वजा जाता निव्वळ सात लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे उकळकार सांगतात.

ऊस पिकातूनही लाखोंचे उत्पन्न !

• दुसरीकडे असलेल्या २ एकरांपैकी चार एकरात ऊस पिकाची लागवड केली आहे. त्याठिकाणी उसाची उंची १५ ते १८ फुटापर्यंत जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

• खर्चवजा जाता किमान १७ ते १८ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे ते सांगतात. त्यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन, नवीन तंत्रज्ञान आणि रात्रंदिन मेहनतीला पर्याय नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

पिण्यासही नव्हते पाणी, तेथे फुलविली आता शेती !

• २० वर्षांपूर्वी हा भाग ड्रायझोन झाला होता. पिण्यासही पाणी नव्हते. मात्र, चोंढी प्रकल्पामुळे या गावात जमिनीखालील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळेच आता भरपूर पाणी उपलब्ध आहे. त्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. एका ठिकाणी असलेल्या ५.५ एकरात मुबलक पाणी आहे. तेथे त्यांनी केळी पीक लावले आहे.

• सोबतच आंतरपीक म्हणून आता कोथिंबीर लावणार आहेत. सावलीची व्यवस्था म्हणून बोरूची लागवड केली जाईल. त्याचा वापर खत म्हणूनही केला जातो, असेही महादेव उकळकार यांनी सांगितले. तसेच २० वर्षांपूर्वी हा संपूर्ण भाग ड्रायझोन होता जेथे आता कायापालट झाला आहे हेही विशेष.

हेही वाचा : पोह्यापासून ते बियर पर्यंत ज्वारी पासून काय काय होतंय; वाचा ज्वारीच्या मूल्यवर्धित पदार्थांची सविस्तर माहिती

टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेतीबुलडाणाशेती क्षेत्रमार्केट यार्डफलोत्पादन