Join us

पाच महिन्यांत ३० गुंठ्यांमध्ये घेतले ५ लाख रुपयांचे उत्पन्न; गावरान लसणाचा यशस्वी अंकुश पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:24 IST

Agriculture Success Story : ग्राहकांची गावरान लसणाची आवड ओळखून एका वाफ्यावर सुरू केलेल्या लसणाला मोठी मागणी मिळताच ३० गुंठ्यात गावरान लसूण लागवड करून अवघ्या पाच महिन्यांत पाच लाखांचे उत्पन्न घेत हिवरा येथील अंकुश लगड या उच्चशिक्षित तरुणाने आर्थिक उभारी घेतली आहे.

नितीन कांबळे 

नोकरीच्या शोधात शहरात गेलेल्या तरुणाने शहरी भागातील ग्राहकांची गावरान लसणाची आवड ओळखून एका वाफ्यावर सुरू केलेल्या लसणाला मोठी मागणी मिळताच ३० गुंठ्यात गावरान लसूण लागवड करून अवघ्या पाच महिन्यांत पाच लाखांचे उत्पन्न घेत हिवरा येथील अंकुश लगड या उच्चशिक्षित तरुणाने आर्थिक उभारी घेतली आहे.

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हिवरा येथील अंकुश अशोक लगड हा उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात काही वर्षांपूर्वी पुणे शहरात गेला.

लोकांची गावरान मालाला मिळणारी पसंती लक्षात घेऊन गावरान लसूण विक्रीसाठी नेला. त्याला वाढती मागणी व मिळणारा चांगला भाव लक्षात घेतला. गावी आल्यानंतर ३० गुंठे क्षेत्रात अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून ५० हजार रुपयांचे गावरान लसूण बियाणे आणले. त्याची गादी वाफा पद्धतीने लागवड केली.

सदरील लसूण साधारण साडेचार ते पाच महिन्यात विक्रीला आला. यातून पाच लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. या  लसूण शेतीला वडील, आईच्या मोठी मदत मिळाली. तसेच यासाठी कृषी विभागाकडून चांगले मार्गदर्शन देखील मिळाले असल्याचे अंकुश सांगतो.

गावरान लसूण हा कमी पाण्यावर आणि अल्प मेहनतीत येतो. यासाठी मोठे कष्ट नाही. तरुणांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून नोकरी करण्यापेक्षा मन लावून आधुनिक पद्धतीने शेती केल्यास हमखास पैसा हातात येतो. - अंकुश लगड, लसूण उत्पादक शेतकरी.

गतवर्षी ६ लाखांचे उत्पन्न

लगड यांनी गतवर्षी आपल्या शेतात १८ गुंठ्यात लसूण लागवड केली होती. त्याला प्रतिकिलो ५०० रुपयांचा भाव मिळाला होता. १८ गुंठ्यात ६ लाखांचे उत्पन्न मिळाले होते.

हेही वाचा : कांदा उत्पादकांच्या एकजुटीला यश; माणिकपुंज परिसरातील शेतकऱ्यांनी धरली प्रगत शेतीतून परराज्यातील बाजारांची वाट

टॅग्स :शेतकरी यशोगाथाबीडशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजार