Join us

आठशे एकर टरबूज लागवडीतून कोट्यवधींचे उत्पन्न, टरबूजाने बदलले शेतकऱ्यांचे अर्थकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 12:07 PM

गोदावरी नदीच्या काठावर उमरा गावातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळ्यात टरबूज उत्पादनात क्रांती घडवली..

गोदावरी नदीच्या काठावर उमरा गावातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळ्यात टरबूज उत्पादनात क्रांती घडवली. ८०० एकर टरबूज लागवड करून तीन महिन्यात जवळपास २० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न येथील शेतकऱ्यांनी मिळविले. यंदा निसर्गाच्या संकटामुळे हतबल झालेल्या येथील शेतकऱ्यांचे मात्र टरबुजाने गावचे अर्थकारण बदलून टाकले.

गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या गावात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. जायकवाडी धरणाचा डावा कालवा आणि गोदावरी नदीच्या पात्रातील ३ उच्च पातळीच्या बंधाऱ्याने या भागात सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. उसाबरोबर अनेक शेतकरी टरबूज लागवडीकडे वळले. दरवर्षी शेतकरी टरबूज लागवड करतात.

टरबूज लागवडीचा शेतकऱ्यांना चांगला अनुभव आहे. गोदा काठच्या गावातील शेतकरी बटाईनेदेखील टरबूज लागवड करतात. यावर्षी ऊस कमी असल्याने शेतकऱ्यांनी टरबूज लागवडसाठी पुढाकार घेतला. उमरा गावात जवळपास ८०० एकर टरबूज लागवड केली. यावर्षी टरबुजाला चांगला चांगला भाव मिळाल्याने कमी कालावधीत शेतकऱ्यांना अधिक लाभ झाला आहे कमी कालावधीत येणारे टरबूज पीक सध्या शेतकऱ्यांच्या पसंतीचे पीक ठरले आहे. चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

एकरी घेतले जाते २० ते २५ टन उत्पादन

शेतकऱ्यांना सरासरी एकरी २० ते २५ टन उत्पादन मिळत असल्याने टरबूज पिकातून शेतकऱ्यांचा खिसा चांगला भरला आहे. फेब्रुवारी ते मार्च या काळात शेतकऱ्यांचे टरबूज पीक काढण्यात आले. सध्या उन्हाचा पारा वाढत असताना टरबूज, खरबूज, मोसंबी, लिंबू, संत्रा अशा फळांना मोठी मागणी असते.

या वर्षी शेतकऱ्यांना टरबूज पिकाने चांगले उत्पन्न दिले आहे. गावात ८०० एकर टरबूज लागवड झाली. सध्या टरबूज विक्री सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे टरबुजाची मागणी वाढू शकते. त्यामुळे टरबुजाचे दर आणखी वाढू शकतात. - मुंजाभाऊ कोल्हे, शेतकरी

शेतकऱ्यांच्या बांधावरून खरेदी

पाणी, खते, औषधींचे योग्य नियोजन कीड, रोगांवर नियंत्रणामुळे टरबूज सहा ते सात किलोपर्यंत भरत आहे. परिणामी व्यापारी थेट शेतकऱ्यांशी संपर्क करून शेतकऱ्यांचे टरबूज बांधावर येऊन खरेदी करीत आहेत. सरासरी १५ रुपये रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. तीन ते चार महिन्यात उमरा गावात टरबूज पिकापासून २० कोटी रुपये उत्पन्न झाल्याचे शेतकयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :शेतीलागवड, मशागतपैसा