Join us

कुंडलच्या शेतकऱ्यांकडून उच्चांकी १३१ टन उसाचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 9:03 PM

क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड साखर कारखान्याने ठरावीक शेतकाऱ्यांना पथदर्शक प्रकल्पातून विशेष प्रयत्न करून जास्ती उत्पादनासाठी प्रयत्न केले, त्यातील उदय लाड या शेतकऱ्याने एकरी १३१.४३४ टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेतले.

अशुतोष कस्तुरेकुंडल : क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड साखर कारखान्याने ठरावीक शेतकाऱ्यांना पथदर्शक प्रकल्पातून विशेष प्रयत्न करून जास्ती उत्पादनासाठी प्रयत्न केले, त्यातील उदय लाड या शेतकऱ्याने एकरी १३१.४३४ टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेतले. पहिल्याच प्रयत्नात शेतकऱ्याने उच्चांकी उत्पादन घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

यंदा प्रतिकूल हवामान असतानाही केवळ कारखान्याकडून पुरवलेले तंत्रज्ञान, योग्य सल्ला आणि चिकाटीच्या जोरावर उदय लाड यांनी गतवर्षी आडसाली हंगामात ३ जून रोजी को-८६०३२ या जातीची दीड एकर क्षेत्रावर क्रांती कारखान्याच्या पायलट योजनेतून ऊस लागण केली होती. जमिनीची सुपिकता वाढणेसाठी लागणीपूर्वी क्रांती कंपोस्ट व शेणखताचा वापर केला हिरवळीचे खत म्हणून तागाचे पीक घेतले. साडेचार फुटावर सरी काढून, दोन फूट अंतराने एक डोळा लागण केली, लागणीसाठी कारखान्याच्या बेणेमळ्यातील प्रमाणित बेणे बेणेप्रक्रिया करून वापरले होते.

लागणीपूर्वी डीएपी, पोटॅश, युरिया, गंधक व रिजेंट डोस म्हणून वापर केला, बाळभरणीवेळी १२:३२:१६, पोटॅश, कॉम्बी जैव भूसुधारक युरिया अमोनियम सल्फेट असा डोस दिला होता. १० फुटातील उसाची संख्या योग्य मिळालेनंतर ३ महिन्यांनी डीएपी, पोटॅश, युरिया, अमोनियम सल्फेट, सागरिका दाणेदार, पोल्ट्री, सिंगल रोटर मारून खत माती आड केले. त्यानंतर १ महिन्यांनी १०:२६:२६, पोटॅश, युरिया, गंधक, कॉम्बी, रिजेंट, जैवसेंद्रिय भूसुधारक, सिलिकॉनचा डोस देऊन रोटरने मोठी भरणी केली.

याशिवाय मोठ्या भरणीनंतर ठिबकमधून अमोनियम सल्फेट, पोटॅश, कॅल्शियम नायट्रेट ही विद्राव्य खते १५ दिवसांच्या अंतराने उसाच्या १२ महिने वयापर्यंत दिली. उभ्या उसातील वाळलेले पाचट २ वेळा काढून सरीमध्ये आच्छादन केले. उसाची वाढ नियमित राहण्यासाठी अन्नघटक, जिवाणू खते व जैव संजीवकाच्या तब्बल ७ फवारण्या या शेतकऱ्याने घेतल्या त्यामुळे उदय लाड यांना हे उच्चांकी उत्पादन मिळाले.

मी सरासरी एकरी ७५ ते ८० टनांचा शेतकरी पण क्रांती कारखान्याच्या ऊसविकास विभागाच्या पायलट योजनेतून एकरी शाश्वत १०० टन या उपक्रमात भाग घेतला व पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. - उदय लाड, प्रगतशील शेतकरी

क्रांती कारखाना नवनवीन तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटत आहे. आता फक्त ठरावीक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी नाही तर कार्यक्षेत्रातील एकूण सरासरी उत्पादन वाढवण्यासाठी पथदर्शक प्रकल्प राबविणार - शरद लाड, अध्यक्ष क्रांती कारखाना

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीपीकखतेसेंद्रिय खत