Join us

गटशेती फायद्याची; शेतकऱ्यांनी ३० एकरमध्ये मिळवलं ७३२ क्विंटल कापसाचं उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 10:20 AM

शेतकरी गटाचं यश; कापसाच्या ४४५ क्विंटल सरकी विक्रीतून मिळाले १२ लाख

रऊफ शेख

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथे जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून राबविल्या जात असलेल्या स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत ३० शेतकऱ्यांच्या एका गटाने ३० एकर शेतीतून ७३२ क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले. तसेच त्यातून निघालेल्या ४४५ क्विंटल सरकीच्या ऑनलाइन विक्रीतून त्यांना १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कापसाच्या १५५ गाठी या गटाने योग्य भाव आल्यानंतर विक्रीसाठी सुरक्षित ठेवल्या आहेत.

जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने कृषी विभागाच्या वतीने स्मार्ट कॉटन हा उपप्रकल्प राज्यातील १२ जिल्ह्यांमधील ५९ तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, गंगापूर, सिल्लोड या चार तालुक्यांचा यात समावेश आहे. या उपप्रकल्पांतर्गत फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील ३० शेतकऱ्यांचा एका गटाने एक जिनसी कापूस लागवड केली.

यातून गटातील एकूण ३० शेतकऱ्यांनी ३० एकर शेतीत एकूण ७३२ क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले. या कापसावर प्रक्रिया पूर्ण करून सरकी वेगळी करून एकूण १५५ गाठी तयार केल्या. या गाठीची प्रतवारी उच्च आणि चांगल्या  दर्जाची आहे. स्मार्ट कॉटन प्रकल्पामध्ये तयार झालेल्या गाठी या स्मार्ट कॉटन ब्रेडखाली विक्री होणार असल्यामुळे या गाठींना भविष्यात चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

सध्या बाजार भावामध्ये होत असलेल्या चढ उतारामुळे गाठी विक्री न करण्याचा निर्णय गटाने घेतला असून त्या गाठी विम्याच्या कवचाखाली सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.

केशर आंब्याने दिली हमी; फळबाग येतेय शेतकर्‍यांच्या कामी

शेतकरी गटाने एक जिनसी बियाणांची लागवड करून त्यावर कपाशीवर कीटकनाशक द्रवाची फवारणी न करता दशपर्णी व लिम्बोळी अर्कचा वापर करून कापूस विषमुक्त पिकविला. ३० शेतकऱ्यांना ७३२ क्विंटल कापसाचे उत्पादन झाले आहे. यात ४४५ क्विंटल सरकी निघाली. तिच्या ऑनलाइन विक्रीतून १२ लाख रुपये मिळाले. तयार १५५ गाठी विमा कवच खाली सुरक्षित ठेवल्या असून योग्य भाव मिळाल्यास विक्री केली जाईल. गाठी, सरकीच्या माध्यमातून किमान ८ लाखांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. - राजू वाढेकर, शेतकरी गटाचे प्रमुख

शेतकऱ्यांनी रात्रंदिवस शेतात घाम गाळून पिकविलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी इथून पुढे शेतकऱ्यांना शेतमालाचे मूल्यवर्धन केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी शेतीत नवीन प्रयोग करून उत्पादन घेतले तर, फायदेशीर ठरेल. चिंचोली नकीब येथील शेतकरी गटाने केलेल्या प्रयलातून त्यांना लाखोंचा फायदा झाला आहे. - भारत कासार, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :कापूसशेतकरीमराठवाडाशेती