Join us

चार गुंठ्यांत काकडी; उत्पन्नामध्ये दोन लाखांच्या वर उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 11:40 AM

शेंडूर येथील युवा शेतकरी विजयकुमार चंद्रकांत डोंगळे यांनी दिली आहे. अवघ्या चार गुंठे क्षेत्रातील काकडीने त्यांना आर्थिक गारवा मिळाला असून, त्यातून दोन लाखांहून अधिक उत्पादन मिळाले आहे.

दत्ता पाटीलम्हाकवे : हवामानानुसार भाजीपाला, फळभाज्या तसेच अन्य उत्पादन घेतले, तर शेतकऱ्यांना निश्चितच चार पैसे जास्त मिळतात. याची प्रचिती शेंडूर येथील युवा शेतकरी विजयकुमार चंद्रकांत डोंगळे यांनी दिली आहे. अवघ्या चार गुंठे क्षेत्रातील काकडीने त्यांना आर्थिक गारवा मिळाला असून, त्यातून दोन लाखांहून अधिक उत्पादन मिळाले आहे.

डोंगळे कुटुंबीय हे सातत्याने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असते. गतवर्षी त्यांनी खडकाळ असणाऱ्या १९ गुंठे जमिनीत ४८ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. ऊस तुटून गेल्यानंतर जमिनीची मशागत करून १० जानेवारीला सरींवर काकडी बी पेरले होते.

आळवणी, जैविक बुरशीनाशक फवारण्या, किडीसाठी डंकमाशी ट्रॅप, मल्चिंग तसेच मशागतीसाठी त्यांना १५ हजार रुपये खर्च आला. दररोज ५० ते ७० किलो काकडी निघते. जवळपासच्या बाजारात विक्री केल्यामुळे ५० पासून ८० रुपयांपर्यंत प्रतिकिलोला दर मिळत गेला.

सभोवती घातलेल्या कुंपणावर दोडक्याचे वेल चढविले होते. त्याच्यापासून ४ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. यासाठी त्यांना वडील चंद्रकांत डोंगळे, पत्नी स्मिता यांचे सहकार्य तसेच अमोल पाटील (निमशिरगाव), अभय सूर्यवंशी तमदलगा, महेश पटेकर (आप्पाचीवाडी) बाबूराव मगदूम (बामणी) यांचे मार्गदर्शन लाभले.

पारंपरिक शेतीला फाटावयाची पंचाहत्तरी गाठलेले चंद्रकांत डोंगळे हे आजही शेतामध्ये तरुणांनाही लाजवेल असे काम करतात. मुलगा विजय याने नवतंत्रज्ञान अवगत केले आहे. त्याच्या सांगण्याप्रमाणे चंद्रकांत डोंगळे हे कार्यरत राहतात. त्यामुळे या कुटुंबाने शेतीच्या उत्पादनातून मोठी प्रगती साधली आहे.

यावर्षी कमी क्षेत्रामध्ये काकडी, भेंडी आणि दोडका यांचे उत्पादन घेतले. यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळाल्याने या क्षेत्रात वाढ करणार आहे. ऊस एके ऊस न करता युवा शेतकऱ्यांनी काही क्षेत्रात ऊस, तर काही क्षेत्रात अन्य पिके घ्यावीत. - विजयकुमार डोंगळे, प्रगतशील शेतकरी, शेंडूर

अधिक वाचा: विजेच्या बेभरवश्याला दिली आधुनिकतेची जोड; भाऊसाहेबांच्या कांदा उत्पादनाला नाही तोड

टॅग्स :शेतकरीशेतीपीकभाज्याबाजारकीड व रोग नियंत्रण