Join us

Farmer Success Story : वीस गुंठे उसातल्या मिरचीने या शेतकऱ्याला केले लखपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:34 IST

कसबा सांगाव येथील सुकुमार विश्वनाथ स्वामी हा शेतकरी आपल्या मिरचीच्या पिकातून लखपती झाला आहे. २० गुंठे शेतीमध्ये मिरचीसह मिश्र पिके, तसेच उसाची लागवड करून आर्थिक प्रगती साधत आहे.

कसबा सांगाव येथील सुकुमार विश्वनाथ स्वामी हा शेतकरी आपल्या मिरचीच्या पिकातून लखपती झाला आहे. २० गुंठे शेतीमध्येमिरचीसह मिश्र पिके, तसेच उसाची लागवड करून आर्थिक प्रगती साधत आहे.

स्वामी यांची ३० गुंठे जमीन आहे त्यापैकी २० गुंठ्यांत ऑगस्टमध्ये 'शकिरा' वाणाच्या मिरचीची लागवड केली. सरींमधील अंतर चार फूट, दोन झाडांतील अंतर तीन फूट ठेवले.

सरासरी २२०० मिरची रोपे लावली. गत पाच महिन्यांपासून त्यांचे मिरचीचे उत्पादन सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी २ टनांपेक्षा जास्त ओली मिरची जवळपासच्या बाजारावर विक्री केली आहे.

किलोमागे साठ ते शंभर रुपये दर मिळाला. सरासरी ६० रुपये दर धरला तरी २ टनांचे १ लाख २० हजार रुपये आतापर्यंत मिळाले आहेत.

जूनमध्ये शेताची उभी-आडवी नांगरट केली. नंतर रोटर मारून चार फुटी सरी सोडली. धनलक्ष्मी भुईमुगाची टोकण केली. सप्टेंबरअखेरीस सुमारे दहा पोती भुईमुगाचे उत्पन्न घेतले.

भुईमूग काढून ८६०३२ या ऊस बियाणाची लागवड केली. त्याचे अपेक्षित उत्पन्न ४० टन आहे. आत्ताच्या दराप्रमाणे ३१०० रुपये टन याप्रमाणे १ लाख २४ हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे.

२० गुंठ्यांत ३ लाख ५१ हजार सरासरी उत्पन्नातून मशागत १० हजार ५ ट्रॉली शेणखत १५ हजार, मजुरी १० हजार खते व पाणी ५ हजार असा खर्च धरला तरी वर्षभरात या वीस गुंठ्यांमधून ३ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

सुकुमार यांनी शेती मशागतीत आई सुशीला विश्वनाथ स्वामी व पत्नी कल्याणी यांची साथ लाभली. त्यामुळेच आपण मिरचीतून लाखाचे उत्पन्न घेऊ शकलो असे 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

अधिक वाचा: Sugarcane Success Story : उच्चशिक्षित शेतकऱ्याने एकरी १२६ टन ऊस उत्पादन घेऊन गाठला उच्चांक

टॅग्स :ऊसमिरचीपीकशेतकरीशेतीबाजार