Join us

Farmer Success Story : उच्च शिक्षित गावडे दाम्पत्याने केले माळरानाचे नंदनवन.....वाचा त्यांची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:00 IST

तरुण उच्चशिक्षित दाम्पत्याने कष्ट आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने खडकाळ माळरानावर ड्रॅगनफ्रुट, सफरचंद यासारखी पिके यशस्वीपणे घेत आर्थिक बाजू मजबूत केली आहे. (Farmer Success Story)

नितीन कांबळे : कडा आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील हनुमंत आणि कल्पना गावडे या तरुण उच्चशिक्षित दाम्पत्याने कष्ट आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने खडकाळ माळरानावर ड्रॅगनफ्रुट, सफरचंद यासारखी पिके यशस्वीपणे घेत आर्थिक बाजू मजबूत केली आहे.

बीड जिल्ह्याच्या सीमेवरील सोलापूरवाडी येथील हनुमंत लक्ष्मण गावडे यांनी एम. टेक. कॉम्प्युटरचे शिक्षण घेतले आहे. पत्नी कल्पनाही उच्चशिक्षित आहेत.

पुण्यातील एका आयटी कंपनीत चांगल्या पगारावर चार वर्षे नोकरी केली. मात्र, कोरोना काळात पुण्यातून गावी यावे लागले. त्यांची वडिलोपार्जित पन्नास एकर शेती होती. मात्र, बहुतांश क्षेत्र माळरानाचे होते.

हनुमंत यांनी गावी आल्यावर कंपनीचे 'वर्क फॉर्म होम' सुरू ठेवले. हे करतानाच त्यांनी शेती 'डेव्हलप' करण्याचा निर्णय घेतला. समाजिक कार्यकर्ते शिरीष थोरवे यांनी स्वतः कडील पाणी उपलब्ध करून दिले.

त्यानंतर वेगळ्या प्रयोगासह संत्रा, सीताफळांचे यशस्वी पीक घेतले. बागेत ट्रॅक्टर चालवण्यापासून बहुतांश कामे पत्नी कल्पना करतात. त्यांना आई लंकाबाई यांची साथ मिळते.

वडिलांचे १७ वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून कौटुंबिक जबाबदारी हनुमंत यांच्यावरच आहे. हनुमंत यांनी चार वर्षांपूर्वी फलटण येथून ड्रॅगनफ्रुटची तर हिमाचल प्रदेशातून सफरचंदाची रोपे आणून लागवड केली.

सफरचंद लागवडीचा प्रयोग करणारे ते या भागातील पहिले शेतकरी आहेत. शिवाय ३ एकरवर संत्रा, २ एकरवर सीताफळांचीही लागवड केली आहे.

यंदा तर त्यांनी सफरचंदात गव्हाचे आंतरपीक घेतले आहे. माळरानावर ड्रॅगनफ्रूट, सफरचंद यशस्वी केल्यानंतर आता पुन्हा दोन एकरवर लागवड सुरू केली आहे.

मीच सगळं पाहते...

शेतीसाठी आम्ही गाव सोडून शेतातच राहायला आलो. येथूनच आमचे काम चालते. शेतीतल्या फळपिकांचा बहार धरण्यापासून खत, पाणी आणि इतर बाबींपासून तोडणीपर्यंत मीच पाहते. शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरही चालवते, असे कल्पना गावडे यांनी सांगितले.

दोन एकरचा शेततलाव

सोलापूरवाडी शिवारात पाण्याची शाश्वत उपलब्धता नसल्याने हनुमंत गावडे यांनी दोन विहिरी, दोन विंधन विहिरी खोदल्या आहेत. कृषी विभागाच्या मदतीने दोन एकर क्षेत्रात उंचवट्यावर पावणेतीन कोटी लिटर क्षमतेचा शेततलाव केला.

शेततलाव उंचावर असल्याने वीजपंपाविना थेट पाइपलाइनने पाणी सर्व फळपिकांच्या क्षेत्राला देता येते. शिवाय सोलर युनिट बसवल्याने विजेच्या खर्चात बचत होत आहे.

फळांची थेट विक्री, रोपे निर्मिती

पहिल्या वर्षी ड्रॅगनफ्रुटचे ४ टन तर यंदा पाच टनापर्यंत उत्पादन निघाले. किलोमागे ११० ते १२० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागणीनुसार नगर, पुणे, सुरतला विक्री करतात. सफरचंदाचे दर वर्षाला ७ क्विंटलपर्यंत उत्पादन निघत आहे. ७५ ते १०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. संत्रा, सीताफळाची स्थानिक बाजारात विक्री करतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबीड