Join us

डॉक्टर करायला लागले केळीची शेती; पहा मग काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 9:56 AM

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकाने शेतीत हात आजमावताना पहिल्यांदाच केळीचे उत्पादन घेतले. पहिल्याच वेळी दोन एकर क्षेत्रात ठिबक सिंचन पध्दत वापरुन, साठ टन केळीचे उत्पादन घेत दोन लाख रुपयांचा उत्पादन खर्च वगळून सोळा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.

शैलेश काटेइंदापूर : वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकाने शेतीत हात आजमावताना पहिल्यांदाच केळीचे उत्पादन घेतले. पहिल्याच वेळी दोन एकर क्षेत्रात ठिबक सिंचन पध्दत वापरुन, साठ टन केळीचे उत्पादन घेत दोन लाख रुपयांचा उत्पादन खर्च वगळून सोळा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. तालुक्यातील शहा गावच्या डॉ. कुमार महादेव गंगावणे यांनी ही किमया करुन दाखवली आहे.

शहा हे उजनी पाणलोटक्षेत्रा लगतचे छोटेसे गाव आहे. पाणलोट क्षेत्रातून विहिर वा जलवाहिन्यांद्वारे पाणी उपलब्ध होत असल्याने हे गाव संपूर्णतः बागायती आहे. डॉ. कुमार महादेव गंगावणे यांची गावात पाच एकर शेती आहे. या पूर्वी त्यांनी ऊसाचे पिक घेतले होते. नगदी पीक असून देखील प्रत्यक्षात खिशात पैसा पडण्यास दीर्घकाळाचा विलंब लागत असल्याने त्यांनी फळशेतीकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. दोन एकरात केळीचे उत्पादन घेण्याचे ठरवले.

त्यांचे नातलग डॉ. हनुमंत गंगावणे यांनी जळगावच्या अभय जैन यांच्याकडून केळीची रोपे आणून दिली. लागवडीनंतर ७० टक्के सेंद्रिय तर ३० टक्के रासायनिक खतांचा वापर केला. रोपे, मशागत, ड्रीप, व इतर खर्च असे दोन एकरासाठी दोन लाख रुपये उत्पादन खर्च झाला.

अधिक वाचा: बारामतीच्या देवकाते बंधूंची निर्यातक्षम विषमुक्त द्राक्ष शेती, दुप्पट उत्पन्नाची हमी

एका एकरात ३० टन प्रमाणे दोन एकर क्षेत्रात एकूण ६० टन केळ्यांचे  उत्पन्न मिळाले. प्रतिकिलोस सरासरी २८ रुपये दर देवून व्यापाऱ्यांनी शेतीच्या बांधावरून केळी विकत घेतली. एकूण सोळा लाख रुपये मिळाले. दोन लाख रुपयांचा खर्च वजा जाता केळीने त्यांना १४ लाख रुपये मिळवून दिले आहेत. झालेल्या फायद्यामुळे त्यांचा फळशेती करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. उर्वरित तीन एकर क्षेत्रात केळीचे उत्पादन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे व तशी लागवड ही केली आहे.

टॅग्स :शेतकरीकेळीशेतीडॉक्टरइंदापूरपीक