Pune : कृषी विभागाच्या योजनेतून शेडनेट उभारले आणि हवामान नियंत्रित शेतीपद्धतीच्या पहिल्याच प्रयत्नात काकडीचे पीक घेणाऱ्या पुरंदर तालुक्यातील कोरडे कुटुंबियांना चांगले अर्थार्जन होत आहे. त्यांना अर्ध्या एकराच्या काकडी पिकातून तीन महिन्यात जवळपास २ लाखांचा निव्वळ नफा होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा मुळातच दुष्काळी तालुका. पाण्याची कमतरता असल्यामुळे येथे कायमच कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य दिले जाते. सिंगापूर येथील माजी सरपंच ज्ञानदेव कोरडे आणि कुटुंबीय हे कित्येक वर्षांपासून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतात. शेतीबरोबरच त्यांचा फळझाडांच्या नर्सरीचा व्यवसाय आहे.
दरम्यान, मागच्या काही दिवसांत कृषी विभागाच्या एका योजनेतून त्यांना शेडनेट मंजूर झाले आणि तीन महिन्यापूर्वी त्यांच्या शेडनेटच्या उभारणीचे काम पूर्ण झाले. शेडनेटमध्ये सुरूवातीला जास्त जोखमीचे पीक नको म्हणून त्यांनी काकडीचे पीक घेण्याचे ठरवले आणि अडीच महिन्यापूर्वी काकडीची लागवड केली.
सेल्फ पॉलिनेटेड म्हणजे ज्या काकडीच्या वाणाला परागीभवनाची गरज नसते अशा काकडीची लागवड त्यांनी केली. लागवडीनंतर दीड महिन्यात काकडीच्या हार्वेस्टिंगला सुरूवात झाली. आत्तापर्यंत त्यांचा १५ टनापेक्षा जास्त माल बाजारात गेला आहे. या काकडीला बाजारात १५ रूपयांपासून ५० रूपयापर्यंत दर मिळाला आहे.
खर्चाचे नियोजनसेल्फ पॉलिनेटेड काकडीच्या एक बियाची किंमत ६ ते ७ रूपये एवढी होती. त्यामुळे २५ हजार रूपये केवळ बियाणांवर खर्च झाला. त्यानंतर लागवड, शेणखते, रासायनिक खते, फवारण्या, वेल बांधणी, जाळी, ठिबक, मल्चिंग पेपर आणि मजुरीचा खर्च असा एकूण तीन महिन्यात १ लाखांचा खर्च होणार आहे.
किती मिळणार उत्पन्न?अर्ध्या एकरात २ हजार ५०० काकडीच्या बियांची लागवड केली होती. त्यामध्ये प्रत्येक रोपाला १० किलो माल म्हणजेच एकूण २५ टन माल निघण्याची त्यांची अपेक्षा आहे. बाजारात या काकडीला १० ते १५ रूपयांचा सरासरी दर मिळत असून एकूण उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त होणार आहे. यातून १ लाख रूपयांचा खर्च वजा जाता त्यांना २ लाखांचा निव्वळ नफा यातून शिल्लक राहणार आहे.
शेडनेटमधील पहिल्याच प्रयत्नात काकडी पिकाचा प्रयोग केला आणि कोरडे कुटुंबियांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. अजून १० ते १५ दिवसांत त्यांचा सर्व माल हार्वेस्टिंग होणार असून यानंतर ते वेगळ्या पिकाची लागवड करणार असल्याचं त्यांनी लोकमत अॅग्रोशी बोलताना सांगितलं. दुष्काळी पट्ट्यातील त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.