Pune : मुळातच कोरडवाहू भाग असलेल्या बदनापूर तालुक्यात (Badnapur) जयराम लाखे या तरूण शेतकऱ्याने आपल्या शेतात कापूस लागवडीचा वेगळा प्रयोग केला अन् उत्पादनात तब्बल तिप्पटीने वाढ केली. हा येथील आगळावेगळा प्रयोग असून हलक्या जमिनीतील या प्रयोगाने त्याने कापसाचे उत्पादन ४ क्विंटलवरून १२ क्विंटलवर नेले आहे.
जालना (Jalna) जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील जयराम लाखे हे तरूण मागच्या १० वर्षांपासून कापसाचे पीक (Cotton Cultivation) घेतात. पण हलकी जमीन, कमी पाऊस आणि एकंदरीत मराठवाड्यातील वातावरण या सगळ्यांचा सामना करत त्यांना एकरी केवळ ४ ते ५ क्विंटल सरासरी उत्पादन निघत होते. या उत्पन्नातून शेतीचा खर्चही भागत नव्हता.
पण मागील दोन वर्षांपासून त्यांनी दादा लाड तंत्रज्ञानाचा (Dada lad Cotton Cultivation Technology) अवलंब केला. ४ फुटाची सरी पाडून एका सरीवर सव्वा फुटावर दोन ओळीमध्ये कापसाची लागवड केली. सरीमुळे पावसाळ्यामध्ये शेतीत साठणाऱ्या पाण्यामुळे होणारे नुकसान टळले. त्यानंतर एक खुरपण करून पुढचे तणनियंत्रण हे केवळ तणनाशकाच्या फवारणी द्वारे केले.
दादा लाड पद्धतीचा अवलंबलागवडीनंतर ४० ते ४५ दिवसानंतर कापसाची गळफांदी काढली आणि ७० ते ७५ दिवसानंतर शेंडा कापला. यामुळे एका बोंडाचे वजन हे ४ ते ५ ग्रॅमवरून ६ ते ७ ग्रॅमपर्यंत गेले, परिणामी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच एकरी ११ क्विंटल ५० किलो कापसाचे उत्पादन निघाले. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे जयराम यांच्या कापूस उत्पादनात तब्बल ३ पटीने वाढ झाली आहे.
एसआरटी पद्धतीचाही अवलंबशेतीमध्ये कमीत कमी मशागत करून या कपाशीची लागवड केली आहे. याबरोबरच या कपाशीवर रोटर मारून काडीकचरा जमिनीतच कुजवण्यात येणार आहे. त्यामुळे खतांचा आणि मशागतीचा खर्च वाचणार आहे. त्याबरोबरच पुढच्या वर्षीही याच सरीवर कापसाची याच अंतरावर लागवड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बदनापूर तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होतो. त्यामुळे येथे कायम दुष्काळसदृष्य स्थिती असते. या हलक्या जमिनीतही जास्त उत्पन्न काढण्यासाठी गावातील प्रयोगशील शेतकरी बळीराम काळे, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथील सोमवंशी सर, डाके सर यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाल्याचं जयराम सांगतात.