पोपटराव मुळीक
लासुर्णे (ता. इंदापूर) : येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी ओंकार पवार यांनी आपल्या शेतातील केळी थेट परदेशातील इराण या देशांमध्ये निर्यात केली आहे. या केळीला निर्यात केल्यामुळे जास्तीचा दर मिळाला असून यामधून युवा शेतकरी ओंकार पवार यांना लाखो रुपयाचे उत्पादन मिळणार आहे.
इंदापूर तालुक्यातील उच्चशिक्षित तसेच युवा शेतकरी ओंकार पवार यांची बेलवाडी तसेच लासुर्णे या भागामध्ये शेती आहे. पवार कुटुंबीय आपल्या शेतीमध्ये ऊस, डाळिंब, पपई अशा प्रकारची पिके घेत असत. परंतु अलीकडील काळात डाळिंब आणि पपई या फळबागावर रोगांचे प्रमाण वाढले असल्याने या पिकाची शेती धोक्यात आली आहे. यामुळे ओंकार ने आपण आपल्या शेतातील पीक बदलण्याचा निर्णय घेतला आणि केळी हे पीक घेण्याचे ठरविले.
ओंकार यांनी १८ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या शेतात केळीची लागवड केली. लागवड करताना आठ बाय पाच वर रोपांची लागवड केली. ओंकार ने आपल्या शेतातील ६० गुंठे क्षेत्रामध्ये दोन हजार रोपांची लागवड केली होती. केळीची लागवड केल्यापासून प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत ठिबक सिंचन आदींचा वापर केला. अधिक उत्तम पद्धतीचे केळीचे पीक आणले आणि सध्या या केळी पिकाची तोड सुरू आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये लागवड केलेल्या केळी या पिकाची सध्या तोड सुरू असून केळी या पिकाच्या एका घडाचे वजन ३९ ते ४४ किलो मिळत आहे. यामुळे सरासरी हिशोब केला तर ६० गुंठे क्षेत्रामध्ये ७० ते ८० टन उत्पादन मिळू शकते. २७ हजार रुपये टन हा जर दर मिळाला तर ६० गुंठे क्षेत्रामध्ये केळी या पिकातून २१ लाखांपेक्षा जास्त रुपयांचे उत्पादन मिळणार आहे.
पवार कुटुंबियांनी तीन पिढ्या शेतीमध्ये केलेल्या कष्टाचे फळ मिळाले. या ऊर्जेतून अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आधुनिक शाश्वत शेती करण्यावर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आमच्या केळीची निर्यात झाल्यानंतर आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे मनापासून समाधान आहे, इंदापूर खरेदी-विक्री संघाच्या संचालिका प्रतिभा पवार, अॅड. माधवी पवार व मोसमी पवार यांची साथ लाभली म्हणून ही किमया साधली असल्याचे उच्चशिक्षित युवा शेतकरी ओंकार पवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.