Join us

Agro Rangers : पुण्यातील दुष्काळी खेड्यातल्या तरूणाची दखल संयुक्त राष्ट्राने कशी घेतली?

By दत्ता लवांडे | Updated: January 16, 2025 19:06 IST

अॅग्रो रेंजर्सच्या आणि सिद्धेशच्या या कामाची दखल घेत संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन म्हणजेच UNCCD या संस्थेने सिद्धेशला Land Hero पुरस्काराने २०२४ मध्ये सन्मानित करण्यात आलं. यासोबतच आयआयएम बंगळुरू, पाबळ विज्ञान आश्रम, कृषीथॉन अशा संस्थांनी अॅग्रो रेंजर्सच्या कामाची दखल घेतलीये. 

दुष्काळग्रस्त खेड्यातून एक तरूण येतो, रासायनिक खतांच्या वापरामुळं नापीक होत चाललेली माती वाचवण्यासाठी धडपड करतो आणि याच कामाची दखल राज्यात, देशपातळीवर नाही तर संयुक्त राष्ट्राची एक संस्था घेते. या तरूणाने शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाबरोबर माती संवर्धनाचं यशस्वी मॉडेल शोधून काढलंय. २ हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलंय आणि २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतात त्याने हे मॉडेल यशस्वी करून दाखवलंय. ही कहाणी आहे एका दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरूण सिद्धेश साकोरे या अवलियाची, माती वाचवणाऱ्या तरूणाची...!

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर हे दुष्काळी गाव. येथील शेतीमधून जेमतेमच उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतं. सिद्धेश साकोरे येथीलच रहिवाशी तरूण. त्यालाही पूर्णवेळ शेती करण्याची आवड होती पण पाण्याची कमतरता असल्यामुळे त्याने नोकरीसाठी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर सिद्धेशने गावाजवळीलच पाबळ इथल्या विज्ञान आश्रमासोबत शेतकऱ्यांसाठी काम करायला सुरूवात केली. येथे त्याने ४ ते ५ हजार स्थानिक शेतकऱ्यांच्या माती परिक्षणावर काम केलं. यातून त्याला मातीतील सेंद्रीय कर्ब ०.३ पेक्षा खाली गेल्याचं लक्षात आलं. दिवसेंदिवस खराब होत चाललेल्या मातीच्या आरोग्याचं गांभीर्य लक्षात घेत त्याने पूर्णवेळ माती वाचवण्यासाठी काहीतरी काम करण्याचं मनोमनी ठरवलं. 

धामारी गावामध्ये सिद्धेश याची वडिलोपार्जित कोरडवाहू शेती होती. यामध्ये त्याने विविध प्रयोग करायचं ठरवलं. पण सुरूवातीला त्याच्या कुटुंबियांनी त्याला विरोध केला. कुटुंबियांच्या विरोधामुळे सिद्धेशने शेजारच्याच गावात शेती भाड्याने घेऊन तिथे हे प्रयोग यशस्वी करून दाखवले आणि त्यानंतर आपल्या वडिलोपार्जित शेतात शेती करायला सुरूवात केली. 

माती वाचवण्यासाठी काम करायचं तर सहकाऱ्यांची, टीमची आवश्यकता होती. म्हणून पुढं त्याने जयदीप सरोदे या मित्राला सोबत घेऊन अॅग्रो रेंजर्स या एनजीओची स्थापना केली. अशा प्रकारे माती वाचवण्याचं आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचं काम सुरू झालं. कमी खर्चात शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न कसं घेता येईल आणि त्यातून माती संवर्धन कसं होईल असं मॉडेल सिद्धेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शोधून काढलं.

कसं केलं मॉडेल तयार?माती संवर्धनासाठी पूर्णवेळ काम करत असताना शेतकऱ्यांनाही उत्पन्न मिळाले पाहिजे हा हेतू समोर ठेवून त्यांनी विविध मॉडेलवर काम केले. मल्टिलेअर फार्मिंग, बांबू हाऊस फार्मिंग, परदेशी भाजीपाला, पॉलीहाऊस आणि वनशेती मॉडेलचा अभ्यास केला. त्यातील वनशेती मॉडेलमधून त्यांना चांगला रिझल्ट मिळाला आणि याच मॉडेलवर काम करण्याचं त्यांनी ठरवलं.

लोकांनी काढलं वेड्यात...!धामारी गावच्या ओसाड माळरानावर ज्यावेळी सिद्धेश आणि त्याच्या सहकाऱ्याने वनशेतीच्या प्रयोगाला सुरूवात केली त्यावेळी लोकं त्याला नाव ठेवायचे. "हे पोरगं तोट्यात जाणार, यांचं काही खरं नाही"  असे टोमणे लोकं मारायचे. पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि हा प्रयोग यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या शेतावर राबवला.

बियाणे बँक आणि विक्रीत्यांचे हे मॉडेल पूर्णपणे सेंद्रीय शेती मॉडेलशी मिळतंजुळतं आहे. सुरूवातीला त्यांनी देशी वाणांच्या पालेभाज्या आणि फळभाज्या आठवडे बाजारात विक्री केल्या. त्याबरोबरच बियाणे बँकसुद्धा त्यांनी बनवली असून या माध्यमातून देशी बियाणांचे संवर्धन केले जाते.

शेतकऱ्यांसोबतचे काम'अॅग्रो रेंजर्स'कडून शेतकऱ्यांना वनशेतीसाठी ९० टक्के सबसिडी देण्यात येते. यामध्ये वनशेतीसाठी लागणाऱ्या झाडांची रोपे, खते, औषधे आणि प्रशिक्षण देण्यात येते. त्यांनी आत्तापर्यंत २ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या वनशेतीच्या मॉडेलचे प्रशिक्षण दिले आहे. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना इच्छा आहे अशा १८० शेतकऱ्यांच्या २०० एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर वनशेतीचा प्रकल्प राबवला असून या माध्यमातून ते शेतकरी सक्षमीकरणाचं आणि माती संवर्धनाचं काम करत आहेत. येणाऱ्या दोन ते चार वर्षामध्ये २ हजार एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर हे मॉडेल घेऊन जाण्याचं त्यांचं ध्येय आहे.

कामाची दखलअॅग्रो रेंजर्सच्या आणि सिद्धेशच्या या कामाची दखल घेत संयुक्त राष्ट्राच्या 'युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन' म्हणजेच UNCCD या संस्थेने सिद्धेशला 'Land Hero' पुरस्काराने २०२४ मध्ये सन्मानित करण्यात आलंय. यासोबतच आयआयएम बंगळुरू, पाबळ विज्ञान आश्रम, कृषीथॉन अशा संस्थांनी अॅग्रो रेंजर्सच्या कामाची दखल घेतलीये. 

धामारी गावातील भकास माळरानापासून सुरू झालेला त्याचा प्रवास संयुक्त राष्ट्राच्या आणि विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत येऊन पोहोचलाय. मातीसाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाची शिदोरी सिद्धेशला मिळालीये. त्याच्या कामातून प्रेरणा घेऊन अनेक तरूण त्याच्यासोबत जोडले जात आहेत. आज त्याच्या टीममध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरूण काम करतायेत हे विशेष. सिद्धेशचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे