Join us

Women Success Story : बचत गटातून स्वावलंबनाची प्रेरणा; हळद्यातील रेखाताईंचा यशस्वी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 10:31 IST

Women Success Story : घरच्या परिस्थितीशी झुंज देत रेखाताई उटकुलवाड यांनी बचत गटाच्या माध्यमातून 'मंचुरियन मसाला' उद्योग उभा केला. आज त्यांचा मसाला दिल्लीपासून हैदराबादपर्यंत पोहोचला आहे.वाचा त्यांचा यशस्वी प्रवास. (Women Success Story)

गोविंद शिंदे

घराचा खर्च भागवण्यासाठी सुरुवात झालेला एक छोटा प्रयत्न आज लाखो रुपयांच्या व्यवसायात बदलला आहे. हळदा (ता. कंधार) येथील रेखाताई गोविंद उटकुलवाड यांनी बचत गटाच्या माध्यमातून केवळ स्वतःचा व्यवसाय उभा केला नाही, तर इतर महिलांसाठीही प्रेरणादायी वाट निर्माण केली आहे. (Women Success Story)

संघर्षातून यशाकडे प्रवास

रेखाताई यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ग्रामीण भागातील महिलांप्रमाणेच त्यांनाही स्थिर उत्पन्नाचा अभाव आणि घरगुती जबाबदाऱ्यांचा ताण होता. पती शासकीय नोकरीत नव्हते, त्यामुळे घरखर्च भागवण्यासाठी त्यांनी मजुरीची कामे सुरू ठेवली. मात्र, काहीतरी स्वतः चं करायचं हे स्वप्न त्यांच्या मनात होतंच.

त्यातूनच त्यांनी गावात छोटंसं किराणा दुकान सुरू केलं. परंतु नफा फारसा होत नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी हार न मानता नव्या संधींचा शोध सुरू ठेवला.

'उमेद'मुळे उमटली नवसंजीवनी

दरम्यान, ‘उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ पंचायत समिती, कंधार येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रेखाताईंनी दोन वर्षांपूर्वी ‘देवांशी महिला स्वयंसहायता गट’ स्थापन केला.

गटाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाचे प्रशिक्षण मिळू लागले आणि त्याचवेळी रेखाताईंना ‘मंचुरियन मसाला’ तयार करण्याची कल्पना सुचली.

त्यांनी गटातील महिलांसोबत मिळून मसाले उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी बँकेमार्फत ३ लाख रुपयांचे कर्ज मिळाले.

‘मंचुरियन मसाला’ने घेतली भरारी

प्रारंभी मर्यादित साधनसामग्रीवर काम सुरू झाले. मशिनरी, कच्चा माल, पॅकिंग आणि विक्री या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण त्यांनी घेतले.हळूहळू त्यांचा ‘मंचुरियन मसाला’ गावपातळीवर लोकप्रिय झाला. गुणवत्तेमुळे ग्राहकवर्ग वाढू लागला आणि मागणी जिल्ह्याबाहेरही पोहोचली.

आज त्यांच्या या व्यवसायातून दरवर्षी तब्बल दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यांच्या उत्पादनाची विक्री मुंबई, दिल्ली, हैदराबाद, तेलंगणा अशा विविध राज्यांमध्ये ‘उमेद’ अभियानाच्या स्टॉलद्वारे होते.

इतर महिलांसाठी प्रेरणास्थान

आज रेखाताईंच्या ‘देवांशी महिला स्वयंसहायता गटात’ इतर १० महिला सदस्य व्यवसायात सहभागी आहेत. त्या सर्वजणी आज आत्मनिर्भर बनल्या आहेत.

जिद्द आणि स्वावलंबन

रेखाताई उटकुलवाड यांनी दाखवून दिलं की, संधी मिळाली की स्त्रिया काहीही करू शकतात. त्यांच्या चिकाटी, आत्मविश्वास आणि उमेद अभियानाच्या मदतीने त्यांनी केवळ कुटुंबाचं नव्हे तर समाजाचंही नशीब बदललं आहे.

बचत गट हे केवळ साठवणीचे साधन नसून स्वावलंबनाचे शस्त्र ठरू शकते.

शासनाच्या योजनांचा योग्य वापर केल्यास ग्रामीण भागातील महिलाही उद्योग क्षेत्रात यश मिळवू शकतात.

आत्मविश्वास आणि सातत्य हेच यशाचे खरे सूत्र रेखाताईंनी आत्मसात केले. 

व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्यासाठी मशिनरी आणि कच्चामालासाठी निधी गटातून उभा केला. उमेदच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यामुळे आज आमचा मसाला जिल्ह्यातच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध झाला आहे. माझ्यासह गटातील महिलांनाही मी व्यापारी बनवले. - रेखाताई उटकुलवाड

हे ही वाचा सविस्तर : Solar Drying Project : मंदीतील संधीचे सोने करत; शेतमालाला दिले नवे आयुष्य वाचा वंदना ताईंचा यशस्वी प्रवास वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Perseverance Pays Off: Woman's 'Manchurian Masala' Business Success Story

Web Summary : Rekha Utkulwad overcame financial hurdles in Halda to establish a successful Manchurian masala business. With determination and support from a self-help group, she transformed her circumstances. Her product now reaches markets beyond the district.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती