ऊस तोडणीनंतर पाचट न जाळता ते सरीत कुजवले तर पिकाला अधिक फायदेशीर ठरते, हे संशोधनातून सिद्ध झाले असून विना खर्चात खोडवा उसाला चांगला फायदा मिळू शकतो. कृषी विभागाने यापूर्वी पाचट अभियान मोठ्या प्रमाणात राबविले होते. त्याचे चांगला परिणामही दिसत होते.
पाण्याचा अतिवापर व सेंद्रिय खताच्या नगण्य वापरामुळे जमिनीचे आरोग्य वेगाने बिघडत आहे. दिवसेंदिवस जमीन टणक बनत असून त्यामुळे पिकांच्या मुळाच्या वाढीवर विपरित परिणाम होत आहे.
ऊस तुटून गेल्यानंतर सरासरी १० टन प्रति हेक्टरी इतका पाला शेतात उपलब्ध होतो. ऊस तुटून गेल्यानंतर जमीन स्वच्छ करण्याच्या हेतूने ७० ते ८० टक्के शेतकरी हा पाला जाळून टाकतात.
यामुळे केवळ ५ टक्के म्हणजे सुमारे हेक्टरी ५०० किलो राख शिल्लक राहते. तसेच मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होऊन उष्णतेने जमिनीचे आणि त्यातील उपयुक्त जीवजंतू, गांडुळाची अपरिमित हानी होते. त्याऐवजी पाचट एक आड एक सरीतच कुजवले तर अधिक फायदेशीर ठरते.
शेतकऱ्यांनी पाचट न जाळता एक सरी आड ते कुजवले तर चांगला फायदा दिसून येतो. पाण्याची बचत आणि उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी पाचट सरीतच ठेवावे.
पाचट ठेवण्याचे फायदे▪️सरीत पाचटाच्या आच्छादनामुळे तण उगवू शकत नाही. त्यामुळे भांगलणी व मशागतीच्या खर्चात व श्रमात ५० टक्के बचत होते.▪️पाचटामुळे एकाच सरीत पाणी द्यावे लागत असल्याने हेक्टरी दीड कोटी लिटर पाणी व १२५ युनिट विजेची बचत होते.▪️पाचटाच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.▪️शेतात ओलाव्याचे प्रमाण (१५ ते २० दिवस) जास्त काळ टिकून राहते.▪️उसाच्या उत्पादनात एकरी ४ ते ६ टनांनी वाढ होते.▪️पाचट कुजल्यानंतर खोडव्या पिकाला सेंद्रिय खत मिळते.▪️शेतात गांडूळाची व उपयुक्त जिवाणूंची नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर होते.
अधिक वाचा: Sugarcane Organic Farming : ऊस शेतीसाठी प्रत्येकवर्षी सेंद्रिय खत हवेच का? वाचा सविस्तर