Join us

गांडूळ खताची शेतीला द्या साथ; जमिनीची सुपीकता टिकून उत्पादनात मिळेल वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 14:09 IST

Vermi compost Fertilizer : रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते, मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे.

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते, मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे.

गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.

देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे.

दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे.

शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. वर्षानुवर्षे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे.

दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

गांडूळ खत म्हणजे काय ?

गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला २४ तासांचा कालावधी लागतो.

गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते.

गांडूळखत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे. 

गांडूळास दानवे, वाळे, केचवे, शिदोड, करडू किंवा भूनाग असे अनेक नावे आहे. पृथ्वी तळावर हजारो वर्षापासून गांडूळ अस्तित्वात असून त्याचे रंग व आकार भिन्न भिन्न प्रकारचे आढळून येतात. गांडूळ जांभळी, लाल, तांबडी, निळी, हिरवी व फिकट तांबूस अशा विविध रंगाची असतात.

प्राणी शास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे गांडूळ अनेलीडा या वर्गात दहा कुळामध्ये जवळ जवळ ३२०० जातींची गांडुळे असून त्यापैकी सुमारे ३०० जातीची गांडुळे भारतात आढळून येतात.

जमिनीच्या वरच्या थरात वास्तव्य करून राहणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करणारे व जमिनीत खोलीवर राहून जमिनीत जमिनीत मशागत करून मातीवर उपजीविका करणारे असे दोन गट आहेत. 

गांडूळ खत तयार करण्यासाठी महत्वाचा बाबी

• गांडूळखत प्रकल्प सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा.• शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे ३:१ प्रमाण असावे व गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व १५-२० दिवस कुजवावे.• खड्ड्याच्या तळाशी प्रथमत: १५ ते २०  सें.मी बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा टाकावा.• गांडुळाच्या वाफ्यावर गांडुळे सोडण्याअगोदर १ दिवस पाणी मारावे.• गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे.• व्हर्मीवाश जमा करण्यासाठी गांडूळबेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी, तेथे खड्डा करून व्हर्मीवाॅश जमा करण्याचे नियोजन करावे.

डॉ. श्रीकांत मोहन खुपसेसहाय्यक प्राध्यापकएमजीएम, नानासाहेब कदम, कृषी महाविद्यालय, गांधेली, छ संभाजीनगर.डॉ. व्ही. जी. अतकरे सहयोगी अधिष्ठाता,कृषी महाविद्यालय, नागपुर.

हेही वाचा : बळीराजाने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नव्हे तर व्यवसाय म्हणून पहावे; वाचा आधुनिक शेती व्यवसायाचे फायदे

टॅग्स :खतेसेंद्रिय खतसेंद्रिय शेतीशेतीशेतकरीशेती क्षेत्र