Join us

शेतकरी बांधवांनो, धान्याच्या घरगुती कोठीसाठी अनुदान मिळतेय, असा घ्या लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 16:23 IST

अन्नसुरक्षा अभियानांतर्गत घरगुती साठवणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

आपल्या शेतात पिकविलेले कडधान्य आणि तृणधान्य साठविण्यासाठी आता शेतकऱ्यांना सरकारी अनुदान मिळणार आहे. त्याचा लाभ घेऊन शेतकरी सुमारे ५०० किलो कडधान्य किंवा तृणधान्य साठवून ठेऊ शकतील.

काय आहे योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) व पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत घरगुती साठवणुकीची कोठी (प्रती शेतकरी 5 क्विंटल क्षमता मर्यादेत) या घटकांचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (अर्जामधील अटींची पुर्ततेसह) तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन नांदेड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे  यांनी केले आहे.

कुणाला मिळणार अनुदान अनुसूचित जाती, जमाती, महिला शेतकरी, अल्प व अत्यल्प भुधारक इतर शेतकरी पात्र असतील. 5 क्विंटल साठवणूक क्षमतेच्या कोठीसाठी किंमतीच्या 50 टक्के किंवा रूपये 2 हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान दर लागु असेल. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लकी ड्रॉ पध्दतीचा अवलंब केला जाईल. या घटकाची खरेदी झाल्यानंतर शेतकरी, शेतकरी प्रतिनिधी समवेत अक्षांश व रेखांशासह फोटो घेतल्यानंतर तपासणी करुन लाभार्थ्यांना डी.बी.टी. पध्दतीने त्यांच्या बँक खातेवर अनुदान देण्यात येईल. 

कुठे संपर्क साधायचा?शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाशी किंवा कृषी सहायकाशी संपर्क साधून या योजनेची माहिती घेऊन सहभागी व्हावे.

टॅग्स :सरकारी योजनाकाढणी पश्चात तंत्रज्ञानशेतीशेतकरी