Join us

ज्वारी, मका कापणी केलेल्या शेताची; मजूर करतात मोबाइल ॲपवर मोजणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 1:03 PM

मजुरांच्या कामाची आधुनिक पध्दत

बुलढाणा जिल्ह्यातील वडगाव वान (ता. खामगाव) परिसरासह बावनबीर महसूल मंडळात आधुनिक युगात झालेल्या आमूलाग्र बदलांचा परिणाम जाणवत असताना शेतीक्षेत्रावर डिजिटलायझेशनचा प्रभाव दिसून येत आहे. सद्यःस्थितीत शेतीची कामे करण्यासाठी मजूर आणि मालकांमध्ये नोंद होणारे गैरसमज आता मोबाइल ॲपच्या माध्यमातून दूर केले जात आहेत.

शेतीतील कामे करताना मजूरवर्ग शेतमालकाच्या अंदाजित क्षेत्रफळानुसार एकराच्या कामाची रक्कम ठरवून करत होता. त्यामध्ये पिकाची कापणी, कोळपणी, नांगरटी, फळबाग लागवड इत्यादींचा समावेश होता.

मजूर आणि मालक यांच्यामध्ये क्षेत्रफळावरून गैरसमज व्हायचे. परंतु, आता प्रत्येक मजुराकडे उपलब्ध विविध ॲपच्या पर्यायांमध्ये जमिनीची मोजणी करणारे ॲप उपलब्ध आहे. त्याचाच वापर करून सुशिक्षित मजूर केलेल्या कामाचे क्षेत्रफळ मोजतात. त्यानुसार मजुरी पदरात पाडून घेतात.

अँड्राइड मोबाइलचा सर्वत्र उपयोग

कोरोनाकाळातील ऑनलाइन शिक्षण, वर्क फ्रॉम होम या शासनाच्या निर्णयामुळे प्रत्येक घरात आलेले अँड्रॉइड मोबाइलने सगळीकडे अस्तित्वाची चुणूक दाखवत शेती क्षेत्रातही महत्त्व अधोरेखित केले आहे. यामध्ये हवामानाचा अंदाज, पिकांची नोंद करणे, बाजारभाव पाहणे, पीक विक्री करताना बाजारपेठांशी जुळणे अशी सर्व कामे केली जात आहेत.

मालक नसला तरी मोबाइलची नजर

सध्या आग ओकणाऱ्या उन्हाचा परिणाम शेती क्षेत्रात काम करणारांवरही झाला आहे. शेतीतील कामांच्या वेळाही बदलल्या आहेत. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ७ याच वेळात कामे केली जात आहेत. सकाळी शेत मालक शेतावर आला नाही तरी मजूर शेतात पोहोचून काम निश्चित किती वाजता सुरू केले, यासाठी व्हिडीओ कॉल किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करून शेतमालकाला पाठवतात.

हेही वाचा - गूळ शेंगदाणे नियमित सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीपासून होते सुटका; हाडेही होतात मजबूत

टॅग्स :शेतीशेतकरीग्रामीण विकासअँड्रॉईडशेती क्षेत्र