Join us

Pigeon Pea Crop Management : तूर पिकांतील शेंगा पोखरणारी अळी सह प्रमुख किडीचे 'असे' करा एकात्मिक किड व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 11:30 IST

तुरीचे पीक (Tur Pik) सध्या फुलोऱ्यात तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यस्थितीत तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी, ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडींचा प्रादुर्भाव पिकाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम करू शकतो. तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळ्या शेंगांची हानी करतात ज्यामुळे शेंगांची संख्या कमी होऊ शकते परिणामी उत्पादन कमी होऊ शकते.

तुरीचे पीक सध्या फुलोऱ्यात तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यस्थितीत तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी, ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडींचा प्रादुर्भाव पिकाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम करू शकतो. तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळ्या शेंगांची हानी करतात ज्यामुळे शेंगांची संख्या कमी होऊ शकते परिणामी उत्पादन कमी होऊ शकते.

यासाठी तुर पिकावरील किडीचे एकात्मिक किड व्यवस्थापन (IPM) करणे अत्यंत आवश्यक आहे. एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये जैविक नियंत्रण, रासायनिक नियंत्रण, आणि कृषी पद्धतींचा योग्य वापर केला जातो. यामध्ये पिकाच्या शारीरिक स्थितीचे निरीक्षण करणे, किडींच्या संख्येचे अचूक मूल्यांकन करणे, आणि योग्य वेळेस नियंत्रण उपाय राबवणे यांचा समावेश होतो. यामुळे उत्पादनात देखील वाढ होते.

किडींच्या नियंत्रणासाठी सेंद्रिय किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे, पिकांचे योग्य पोषण करणे आणि योग्य फवारणी पद्धतींचा अवलंब करणे हे महत्त्वाचे ठरते. यामुळे तुरीचे पीक अधिक सशक्त होईल आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होईल.

शेंगा पोखरणारी अळी

तुर पिकाच्या यशस्वी उत्पादनातील सर्वात मोठी अडचण म्हणजे घाटे अळी ( Helicoverpa armigera) हे शास्त्रीय नाव असून Noctuidae या कुळातील आहे. ही बहुभक्षी कीड असून अनेक प्रकारच्या वनस्पतींवर आपली उपजीविका करते. किडीची मादी पतंग तुरीच्या कळया, फुले व शेंगा यावर अंडी घालते अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात पुर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मी लांब पोपटी रंगाची असून पाठीवर करड्या रंगाच्या रेषा असतात मोठया अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात.

शेंगा पोखरणारी अळी साधारणपणे ७ ते १६ पर्यंत शेंगाचे नुकसान करू शकते. “अळीचे अर्धे शरीर शेंगामध्ये तर अर्धे शरीर बाहेर” हे तिचे महत्त्वपूर्ण वैशिष्टे आहे. या अळीमुळे साधारणपणे ३५ ते ४०% नुकसान होऊ शकते. नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये ढगाळ वातावरण असल्यास प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो. 

ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी

(Maruca vitrata) ही कडधान्य पिकावरील ठिपक्यांची शेंगा पोखरणारी कीड आहे. या किडीचा पतंग करडया रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे दिसून येतात. मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढऱ्या रंगाची व अर्ध पारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या आढळतात. अंड्यातुन निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळीचे झुपके करून त्यामध्ये राहून कळ्या, फुले, शेंगा खाते.या किडीचा जीवनक्रम १८ते ३५ दिवसात पूर्ण होतो.

एकात्मिक किड व्यवस्थापन 

१) उन्हाळ्यात खोलवर नांगरणी करावी यामुळे कोष अवस्थेतील किडी सूर्यप्रकाशामुळे किंवा किटकभक्षी पक्षांमुळे नष्ट होतात.२) पिकाची पेरणी योग्य वेळी योग्य अंतरावर करावी.3) पेरणीच्या वेळी मका किंवा ज्वारी चे बियाणे मिसळून टाकावे म्हणजे ते पक्षी थांबे म्हणून काम करते.४) पिक ३० ते ४५ दिवसाचे असताना आंतरमशागत व कोळपणी करुन घ्यावी.५) आंतर मशागत करुन उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी हि तण वेळोवेळी काढून टाकावी.६) शेतामध्ये एकरी २०- २५ पक्षी थांबे लावावेत.  ७) शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी एकरी ५- ६ कामगंध सापळे लावावेत.८) ठिपक्यांची शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या (एम.व्ही ल्युर) नियंत्रणासाठी एकरी ५- ६ कामगंध सापळे लावावेत.९) मुख्य पिकाभोवती एक ओळ झेंडूची लावावी जेणे करुन किडी त्याच्याकडे आकर्षित होतील.१०) मोठया अळ्या असतील तर वेचून नष्ट कराव्यात ११) पीक कळी अवस्थेत असताना अझडीरक्टीन ००.०३ डब्लू, एस. पी (३०० पी.पी.एम) ची फवारणी करावी.१२) तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही. (५०० एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी प्रमाणे वापरावे.१३) किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी (१ ते २ अळ्या प्रति एका मिटर ओळीत किंवा ८-१० पतंग प्रति एक कामगंध सापळा ) ओलांडल्यानंतर खालील पैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी १० लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने करावी व पॉवर पंपाने करावयाची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी. - १) तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ०.५% एस.जी ४.४ ग्रॅम किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एस.सी प्रति ३ मिली किंवा इन्डोक्साकार्ब १५.८० ई. सी ६.६६ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी प्रति २० मिलि किंवा लमडा सायहॅलोथ्रीन ०३% इ. सी प्रति ८ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे. - २) ठिपक्यांची शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी फ्लू-बेंडामाईड २० डब्ल्यू जी ६ ग्रॅम किंवा नोवालूरॉन ५.२५ अधिक इंडॉक्झाकार्ब (४.५० एससी) १६ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

( सर्व कीटकनाशक हे लेबल क्लेम नुसार आहेत)

प्रा. अमोल ढोरमारेकृषि कीटकशास्त्रज्ञ तथा सहायक प्राध्यापकसौ.के.एस.के (काकु) कृषि महाविद्यालय बीडमो.नं : ९६०४८३३७१५

हेही वाचा : Russell's Viper : घोणस या अतिविषारी सर्पाचा वावर वाढला; 'अशी' घ्या काळजी

टॅग्स :तूरपीक व्यवस्थापनकीड व रोग नियंत्रणशेतीपीक