Join us

किसान विकास पत्र योजना, गुंतवणूक करा आणि दामदुप्पट पैसे परत मिळवा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 5:00 PM

पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लहानमोठ्या बचत करण्यासंदर्भातील योजना कार्यान्वित आहेत.

पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लहानमोठ्या बचत करण्यासंदर्भातील योजना कार्यान्वित आहेत. अनेकजण याचा लाभही घेत आहेत. पोस्टाने खास शेतकऱ्यांसाठी म्हणून विशेष किसान विकास पत्र योजना सुरु केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गुंतवणूक केल्यानंतर दुप्पट पैसे मिळत असल्याची हमी हि योजना देत असते. 

काय आहे ही योजना 

केंद्र सरकारच्या माध्यमातून पोस्टाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली. शेतकरी पावसाळ्यात अनेकदा बचत करण्यासाठी धडपडत असतात. या पार्श्वभूमीवर ही योजना सुरु करण्यात आली आहे. तुम्ही शेतकरी म्हणून जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकतात. सरकार या योजनेतंर्गत 7.5 टक्के व्याज देत असून या योजनेत 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जे पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या एफडीच्या बरोबरीचे आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला 9 वर्षे आणि 5 महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागेल. जर समजा तुम्ही या योजनेत 115 महिन्यांसाठी 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील. 

कोण अर्ज करू शकतो? 

यात मुख्यत्वे अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. प्रौढ व्यक्ती अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर तुम्हाला किसान विकास प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र सांभाळून ठेवणे आवश्यक असते. ज्यावेळी मुदत संपुष्ठात येईल तेव्हा प्रमाणपत्र आवश्यक राहील. 

अशी आहे अर्ज प्रक्रिया 

पोस्ट ऑफिसमध्ये जमा पावतीसह अर्ज भरा आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करा. अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्रही सबमिट करा. या दरम्यान एक सूचना लक्षात घ्या की किसान विकास पत्र ही अल्पबचत योजना असून दर तीन महिन्यांनी सरकारकडून योजनेतील व्याजदराचा आढावा घेत आवश्यकतेनुसार बदलला जातो. या योजेनच्या अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन भेट द्यावी. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीपोस्ट ऑफिसबँकशेतकरी