Ranbandhani : उन्हाळी हंगामात घेण्यात येणारी पिके बागायती (Farming) क्षेत्रात घेतली जात असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी योग्य प्रकारच्या रानबांधणीचा अवलंब करणे गरजेचे असते. रानबांधणीची उपयुक्तता काय? जाणून घेऊयात.. जमिनीचा उतार ०.२ ते ०.३ टक्के असेल अशा ठिकाणी सारे पद्धतीचा अवलंब करावा. उताराच्या बाजूने ३ मीटर रुंदीचे सारे पाडून साऱ्याच्या दोन्ही बाजूस २२ सें.मी. उंचीचे वरंबे तयार करावेत. हलक्या जमिनीत ५० ते ६० मीटर, मध्यम जमिनीत ७० ते ८० मीटर व भारी जमिनीत ९० ते १०० मीटर साऱ्यांची लांबी ठेवावी. सारे पद्धत उन्हाळी हंगामातील (Summer Season) बाजरी, सूर्यफूल, भुईमूग व चारा पिकांसाठी योग्य आहे. सरी-वरंबा पद्धत सर्व प्रकारच्या उन्हाळी भाज्या, ऊस आणि फुलझाडांसाठी उपयुक्त आहे. जमिनीच्या प्रकारानुसार आणि पिकानुसार स-यांची रुंदी ७५ ते ९० सें.मी. ठेवून उंची ३० सें.मी. ठेवावी. जमिनीच्या उतारानुसार स-यांची लांबी ७० ते १०० मीटर ठेवावी. जमिनीस उतार जास्त प्रमाणात असेल अथवा उंच सखलपणा मोठ्या प्रमाणात असेल किंवा जमिनीस एकसारखा उतार नसेल अशावेळी सारे अथवा सरी-वरंबा पद्धतीचा वापर न करता पिकास पाणी देण्यासाठी वाफे तयार करावेत. वाफे साधारणतः १० x ४.५ मीटर आकारमानाचे असावेत. वाफे पद्धतीचा वापर पालेभाज्यांच्या पिकांसाठी प्रामुख्याने केला जातो.
गादीवाफे पद्धत रोपे तयार करण्यासाठी तसेच हळद, आले, भुईमूग या पिकांसाठी उपयुक्त आहे. गादीवाफ्याची रुंदी १ मिटरपर्यंत आणि उंची जवळपास १ फुटांपर्यंत ठेवावी. आळे पद्धत ही दोडका, कारली, भोपळा, काकडी यासारख्या वेलवर्गीय भाज्यांसाठी आणि सर्व प्रकारच्या फळझाडांसाठी उपयुक्त असून या पद्धतीत झाड अथवा वेलीभोवतालच्या विशिष्ट आकारमानाचा भागच फक्त भिजवला जातो.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त शास्रज्ञ, कृषी विद्यापीठ