Join us

Rabbi Season : रब्बी हंगामात जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी 'हे' कराच? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 18:35 IST

Rabbi Season : रब्बी हंगामात जास्तीत जास्त कालावधीपर्यंत जमिनीत ओलावा (Soil Moisture)  टिकविणे पीक उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

Rabbi Season : खरीप हंगामात (Kharif Season) किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडलेल्या उशिराच्या पावसाच्या ओलीवर साधारणतः कोरडवाहू  पिकांची वाढ होत असते. त्यामुळे रब्बी हंगामात जास्तीत जास्त कालावधीपर्यंत जमिनीत ओलावा (Soil Moisture)  टिकविणे पीक उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. किमान पिकाची फुलोरा आणि पुढे दाणे भरण्याच्या अवस्थेत जमिनीत ओलावा असणे अत्यंत गरजेचे असते. 

जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी उभ्या पिकात कोळपणी आणि जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठी तसेच तणांची वाढ  होऊ न देण्यासाठी आच्छादनाचा वापर करणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उभ्या पिकात कोळपणी केल्याने तणांचे नियंत्रण तर होतेच, त्याचप्रमाणे पिकाला मातीची भर लागते. 

तसेच भारी जमिनीला मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या भेगा बुजवण्यासही मदत होते. असे म्हटले जाते की जमिनीत दोन कोळपण्या केल्या की, त्या जमिनीत घेतलेल्या पिकाला एक पाणी दिले असे समजायला हरकत नाही. 

कोळपण्या करण्याची शिफारसरब्बी हंगामात ज्वारी पिकास एकूण तीन कोळपण्या करण्याची शिफारस आहे. पहिली कोळपणी पीक लागवडीनंतर तीन आठवड्याने केल्याने जमिनीत वाढणाऱ्या तणांचे नियंत्रण होते. पाच आठवड्यानंतर जमिनीतील ओल कमी होऊन भेगा पडू लागतात. अशावेळी कोळपणी केल्याने भेगा बुडण्यास मदत होते. तिसरी कोळपणी आठ आठवड्यानंतर दातेरी कोळप्यानी करावी ज्यामुळे ओल टिकवून ठेवण्यास मदत होते. 

आच्छादनाचा वापर करून जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे पाण्याचे बाष्पीभवन थांबवणे, तणांचा बंदोबस्त करणे तसेच तणांची वाढ न होऊ देण्यासाठी आच्छादनाचा वापर करून जमिनीत ओलावा टिकवता येतो. वाळलेले गवत, तूरकाड्या, धसकटे, गव्हाचे काड, उसाचे पाचट हे शेतातील पदार्थ अच्छादनासाठी पीक ६ आठवड्यांचे होईपर्यंत हेक्‍टरी ५ टन या प्रमाणात आच्छादनाचा वापर करावा.

अच्छादनाच्या वापराने सुमारे २५ ते ३० मि.मी. ओलावा उडून जाण्यापासून थांबवला जातो. याचाच अर्थ असा की साधारणपणे २५ ते ३० मि.मी. ओलावा पिकाला उपलब्ध होतो. केओलीन किंवा ८ टक्के खडूची पावडर पिकावर फवारल्याने पिकांच्या पानातून होणारे बाष्पनिष्कासन कमी करता येते.

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त शास्रज्ञ, कृषी विद्यापीठ 

टॅग्स :रब्बी हंगामशेती क्षेत्रशेतीशेतकरी