Rabbi Jwari Management : रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा (Lashakri Ali) प्रादुर्भाव होतो, त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. या किडीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा.
हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश व हिवाळा या बाबी अळीच्या वाढीसाठी पोषक आहेत. त्यामुळे या अळीचे व्यवस्थापन (Rabbi Jwari Management) कसे करावे, या लेखातून जाणून घेऊया.
अमेरिकन लष्करी अळीचे प्रादुर्भाव दिसून आल्यास खालीलप्रमाणे एकात्मिक व्यवस्थापन करावे
- ज्वारीच्या पानावर दिसणारे अंडीपुंज व प्रथमावस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
- सर्वेक्षण आणि सामूहिकरीत्या पतंग पकडण्यासाठी एकरी ६ कामगंध सापळे लावावेत.
- शेतात नैसर्गिक मित्रकीटकांचे संवर्धन करावे.
- आर्थिक नुकसान पातळी (१० टक्के प्रादुर्भाव) असल्यास जैविक घटकांचा वापर करावा.
- त्यात ट्रायकोग्रामा एकरी ५०-६० हजार अंडी याप्रमाणे एक आठवड्याच्या अंतराने तीनवेळा शेतात सोडावीत.
- अळ्यांसाठी मेटारायझीयम अॅनिसोप्ली किंवा नोमुरिया रिलेई ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीइतका झाल्यास, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) ५ मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये रासायनिक नियंत्रणासाठी, क्लोर अॅण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३-०.४ मि.ली. किंवा थायमेथोक्झाम (१२.६%) लॅमडा सायहॅलोथ्रिन (९.५%) झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.५ मि.ली. अधिक स्टीकर ०.५ मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाण फवारणी करावी.