Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bhat Perani : बियाण्यांपासून ते पेरणीपर्यंत, भात पेरणीसाठी पूर्वतयारी कशी करावी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:35 IST

Bhat Perani : भात पेरणीची पूर्वतयारी शेतकऱ्यांकडून सुरु आहे. येत्या तीन चार दिवसांत पाऊस येण्याची (Rain) शक्यता आहे.

Bhat Perani : एकीकडे अवकाळी पावसानंतर (Avkali Paus) पावसाने उघडीप दिली आहे. मान्सूनचा पाऊसही रखडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दुसरीकडे भातपेरणीची पूर्वतयारी शेतकऱ्यांकडून सुरु आहे. येत्या तीन चार दिवसांत पाऊस येण्याची (Rain) शक्यता आहे. तत्पूर्वी भात पेरणीसाठी कशी तयारी करावी हे पाहुयात... 

पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात भात पिकाचे रोप तयार (Bhat Rope) करण्यासाठी बियांची पेरणी करावी. भात पिकाचे चांगल्या प्रतीचे सुधारित वाण जसे इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती व फुले राधा विकत घेण्याचे नियोजन करावे. जर हे वाण उपलब्ध नाही झाल्यास कीड व रोगप्रतिकारक्षम जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रसिद्ध स्थानिक सुधारित वाण विकत घेण्याचे नियोजन करावे.

  • तसेच पेरणीकरिता १ मीटर रुंद व १५ सें.मी. उंच आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादी वाफे तयार करावेत. 
  • एक एकर क्षेत्रावरील लागवडीसाठी ४ गुंठे रोपवाटिका पुरेशी होते. 
  • १ गुंठा वाफ्यास २५० ग्रॅम शेणखत किंवा कंपोष्ट खत, ५०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद, ५०० ग्रॅम पालाश खत मातीत मिसळावे.
  • पुनर्लागवड पद्धतीमध्ये उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये रोपवाटिका व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष हे अत्यंत महत्वाचे कारण आहे. 
  • त्यामुळे योग्य रोपवाटिका व्यवस्थापन हे फायदेशीर भात शेतीचे मूळ आहे.

 

चांगले उत्पादन घेण्यासाठी

  • भात पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. 
  • हे तंत्र सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीतील बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती फायदेशीर करणारे आहे.
  • चारसुत्रापैकी पहिले सूत्र रोपवाटीकेसाठी वापरावे जसे भाताच्या तुसाची काळसर राख रोपवाटिकेत बी पेराण्यापुर्वी गादी वाफ्यात मिसळावी. 
  • खात्रीशिर व भेसळविरहीत बियाण्यांचा वापर करावा.
  • खरीप हंगामासाठी रोपवाटिकेसाठी बियाण्याची पेरणी गादीवाफ्यावर १ जून ते ३० जून दरम्यान पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मिमी) झाल्यानंतर सुरु करावी.

पावसाचा अंदाज लक्षात घेता

  • पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतक-यांनी भात पिकांची रोपवाटिका ८ दिवसांच्या अंतराने २ टप्प्यात तयार करावी. 
  • पुनर्लागवड पद्धतीमध्ये सुधारित जातीच्या वाणांचे बियाणे ३५ ते ४० किलो प्रति हेक्टरी वापरावे. 
  • तसेच संकरीत जातीसाठी प्रति हेक्टरी २० किलो बियाणे वापरावे.
  • पेरणीपूर्वी बियाणास ४ ग्रॅम प्रति किलोग्रॅम याप्रमाणे कॅप्टाफॉल (७५ डब्लू.पी) बुरशीनाशक चोळावे. 
  • त्यानंतर अॅझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू व अझोस्पिरीलम या जीवाणू खतांची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :भातखरीपशेतीशेती क्षेत्रपेरणी