Join us

Mango Management : जुन्या आंबा बागेचे पुनरुज्जीवन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:07 IST

Mango Management : जुन्या आंबा बागांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन केल्यास बागेपासून दोन वर्षांमध्ये चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता असते.

Mango Management : १० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या, उत्पादन कमी झालेल्या आंबा बागांचे (Mango Farming)  शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन केल्यास बागेपासून दोन वर्षांमध्ये चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता असते. मग यात छाटणी करून झाडाचा विस्तार आटोपशीर ठेवणे, पाने व फांद्या अधिक सशक्त व जोमदार बनविणे आणि बागेतून सातत्याने अधिक व दर्जेदार उत्पादन मिळवणे. या पद्धतीने झाडाची मशागत कमी खर्चात आणि सहज करता येते. 

नेमकं कशासाठी?

सध्या अस्तित्वात असलेल्या बहुतेक बागा पारंपारिक पद्धतीने म्हणजेच १०×१० मीटर अंतरावर लावण्यात आलेल्या आहेत. उंच वाढलेल्या फांद्यांमुळे झाडांमध्ये सूर्यप्रकाश येत नाही. फळ उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अशा झाडांमध्ये रोग-किडींचा प्रादुर्भाव वर्षभर राहतो. जुनी झाडे उंच वाढली असून फळधारणा झाडाच्या शेंड्यालगत होते, फळांचा आकार लहान राहतो. अशा बागांमध्ये फवारणी, फळकाढणी व इतर आंतरमशागतीची कामे करणे अवघड, खर्चिक तसेच काहीवेळा अशक्य होते. अशा बागांमधील झाडे हवामानबदल व वातावरणातील अनियमिततेला सहज बळी पडतात. पर्यायाने बागायतदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते.

पुनरुज्जीवन योग्य झाडे

दहा वर्षांपेक्षा अधिक वयाची पुरेसा विस्तार न झालेली झाडे किंवा उत्पादकता अत्यंत कमी झालेली झाडे(प्रतिवर्षी पन्नास-साठपेक्षा कमी फळे)अतिदाट झालेली झाडे, ज्यामध्ये सूर्यप्रकाश झाडाच्या आतील बाजूस पोहोचत नाही. ज्या झाडांच्या फळांचा आकार २०० ग्रॅमपेक्षा कमी झालेला आहे.

छाटणीचा हंगाम

ऑक्टोबर हा छाटणीसाठीचा सर्वोत्तम हंगाम आहे. या हंगामामध्ये जमिनीत पुरेसा ओलावा असतो. छाटणीनंतर येणारी पालवी लवकर, निरोगी व सुदृढ असते. उत्तम हवामानामुळे छाटणीनंतर झाडाची मर होण्याची शक्यता कमी असते. नवीन येणाऱ्या पालवीचे नियोजन तसेच या पालवीचे रोग-किडीपासून संरक्षण सहजपणे करता येते.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :आंबाशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेती