Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mango Farming Tips : अवकाळी पावसानंतर आंबा बाग वाचवायची? 'या' उपायांनी टळेल मोठं नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 09:39 IST

Mango Farming Tips : अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे आंबा बागांना मोठा फटका बसत आहे. फळगळ, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, योग्य वेळी काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्यास हे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. जाणून घ्या तज्ज्ञांनी सुचवलेले प्रभावी उपाय(Mango Farming Tips)

Mango Farming Tips : महाराष्ट्रातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ अत्यंत कसोटीचा आहे. अचानक येणारा अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.(Mango Farming Tips)

अशा नैसर्गिक आपत्तीमुळे केवळ फळगळच होत नाही, तर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनावर दीर्घकालीन परिणाम होतो. मात्र, योग्य तांत्रिक व्यवस्थापन केल्यास आपण हे नुकसान निश्चितपणे कमी करू शकतो.(Mango Farming Tips)

बागेतील पाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता

पाऊस थांबल्यानंतर बागेत पाणी साचून राहणे झाडांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

निचरा : बागेत साचलेले पाणी त्वरित बाहेर काढावे. मुळांपाशी पाणी साचल्यास झाडाला 'वॉटर लॉगींग'चा फटका बसतो आणि मुळे कुजण्याची शक्यता असते.

फळ गोळा करणे : पावसामुळे जमिनीवर पडलेली कच्ची किंवा सडलेली फळे बागेत तशीच सोडू नका. ती गोळा करून खड्ड्यात गाडून टाका. अन्यथा, या फळांवर फळमाशीची पैदास होऊन ती संपूर्ण बागेत पसरते.

काढणीचे नियोजन

जर तुमची फळे परिपक्व झाली असतील (अंदाजे ८० ते ८५ टक्के तयार), तर पावसाची उघडीप मिळताच फळांची काढणी करून घ्यावी. यामुळे पुढील पाऊस किंवा वाऱ्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळता येते.

कीड आणि रोगांचा प्राभाव रोखणे

पावसानंतर हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे आंब्यावर विविध कीड आणि रोगांचे आक्रमण होते.

तुडतुडे (Hoppers) व फुलकिडे (Thrips) : ढगाळ हवामानात यांचा प्रादुर्भाव वाढतो. यासाठी शिफारसीत कीटकनाशकांची फवारणी करावी.

भुरी (Powdery Mildew) आणि करपा (Anthracnose) : पावसाच्या पाण्यामुळे बुरशी वेगाने पसरते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्बेन्डाझिम किंवा प्रोपीकोनाझोल यांसारख्या दर्जेदार बुरशीनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा.

कामगंध सापळे : फळमाशी नियंत्रणासाठी बागेत एकरी ४ ते ५ कामगंध सापळे लावावेत.

गारपीट झाली असल्यास काय करावे?

गारपीट ही आंब्यासाठी सर्वात घातक ठरते. गारांमुळे फळांवर आणि फांद्यांवर जखमा होतात.

त्वरित फवारणी : गारपीट झाल्यानंतर २४ तासांच्या आत बागेत बुरशीनाशकाची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे जखमांतून होणारा बुरशीचा शिरकाव रोखता येतो.

फळगळ रोखण्यासाठी संजीवकांचा वापर

अकाली होणारी फळगळ थांबवण्यासाठी नॅफथिल ॲसिटिक ॲसिड (NAA) या संजीवकाची योग्य प्रमाणात फवारणी करावी. यामुळे देठ मजबूत होतात आणि फळगळ कमी होते. तसेच, फळांना पावसापासून वाचवण्यासाठी 'फ्रूट बॅगिंग' (पेपर बॅग लावणे) हा पर्याय अत्यंत प्रभावी ठरतो.

शेतकऱ्यांसाठी काही खास टिप्स

मशागत टाळा : फळे लहान असताना बागेत खोल नांगरणी किंवा मोठी आंतरमशागत करू नका, कारण मुळांना धक्का लागल्यास झाड फळे टाकून देते.

आधार द्या : वाऱ्यामुळे झुकलेल्या झाडांना किंवा नवीन लागवडीला बांबूचा आधार द्या.

हवामान अंदाज : 'मेघदूत' किंवा 'दामिनी' यांसारख्या ॲप्सचा वापर करून हवामानाचा अंदाज घेऊनच फवारणीचे नियोजन करा.

- डॉ. अंगद प्र. गरडे

(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर)

हे ही वाचा सविस्तर :LPG Gas KYC Scam : गॅस केवायसी अपडेट करताना बँक खाते कसे सुरक्षित ठेवावे? सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

अधिक वाचा :Mango Farming Success Story : पाच एकरात आंब्याची क्रांती; सुरेश ठाकूर यांची १२ लाखांची यशोगाथा

English
हिंदी सारांश
Web Title : Protect Mango Orchards After Unseasonal Rain: Key Prevention Measures

Web Summary : Timely action prevents mango orchard damage from unseasonal rain. Ensure drainage, remove damaged fruit, and harvest ripe fruit early. Control pests/fungi with sprays, NAA, and bagging. Protect trees from wind; treat hail damage promptly. Plan based on weather forecasts.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीआंबा