Join us

Cotton Production : कापसाची वेचणी व साठवणूक करताना काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 22:12 IST

Cotton Production : कापसाची किंमत ही त्याची स्वच्छता, शुद्धता, धाग्याची लांबी व मुलायमता यावर ठरवली जाते.

Cotton Production : महाराष्ट्रात कापसाची वेचणी (Kapsachi Vechani) सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत केली जाते. कापसाची किंमत ही त्याची स्वच्छता, शुद्धता, धाग्याची लांबी व मुलायमता यावर ठरवली जाते. स्वच्छ पांढऱ्या तसेच मध्यम ते लांब धाग्याच्या कापसाला चांगला भाव मिळतो. 

कापसाची वेचणी कशी करावी?             

  • कापसाची पहिली वेचणी ३० ते ३५ टक्के बोंडे फुटल्यानंतर करावी. 
  • त्यानंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने पुढील दोन ते तीन वेचण्या कराव्यात. 
  • कापूस वेचणीस उशीर झाल्यास कापूस जमिनीवर गळून पडतो, त्यास माती, काडीकचरा व वाळलेली पाने चिकटतात आणि त्यादरम्यान पाऊस पडल्यास कापूस ओला होऊन पिवळसर पडतो. 
  • वेचणी सकाळी केल्याने त्यावेळी हवेत ओलावा असतो व काडीकचरा व वाळलेली पाने कापसाला चिकटत नाहीत. 
  • संपूर्ण फुटलेल्या बोंडातून कापूस वेचावा, अर्धवट बोंडातील कापूस वेचू नये. 
  • तसेच किडका, पिवळसर, कवडीचा कापूस वेगळा वेचून तो वेगळा साठवावा. 
  • वेचणी करताना कापसाचे धागे तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. 
  • कापूस वेचताना त्यात काडीकचरा येऊ देऊ नये, एकूणच तो स्वच्छ असावा. 

 

कापसाची साठवणूक कशी करावी?  

  • कापसाची साठवणूक कोरड्या व थंड जागेत करावी. 
  • पावसाळी हंगामात, दमट वातावरणात वेचणी केलेला कापूस पिंजण्यापूर्वी चांगला वाळवला गेला पाहिजे. 
  • वेचलेला कापूस साठवणुकीपूर्वी उन्हात वाळवल्याने शेंदरी बोंड अळीपासून होणारे नुकसान टाळता येते. 
  • तसेच साठवताना बोंड अळी किंवा इतर कीड नाही याची खात्री करूनच तो साठवावा. 
  • साठवणुकीत अधून मधून कापूस हलवून त्यात उष्णता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा कापसाचा दर्जा कमी होऊन बाजार भाव कमी मिळण्याची शक्यता असते.

 

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ 

टॅग्स :कापूसशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती