Jamin Kharedi : जमीन आणि भांडणे (Jamin Vad) या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू म्हटले तर काही वावगे वाटणार नाही. जमीन आणि त्या संदर्भातील भांडणे नित्याची झाली आहेत. बहुतांश प्रकरणे कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जमिनीवर होणारे अतिक्रमण (Land Encrochment) होय. जसे की बांध कोरणे, जमिनीवर ताबा घेणे इत्यादी. आजच्या लेखासह पुढील काही लेखातून याबाबत माहिती घेऊयात....
आपल्या मालकीच्या शेतजमिनीवर (Jamin Kharedi) शेजारील शेतकरी बांध कोरत आहे किंवा आपल्या शेत जमिनीवर अतिक्रमण (Land Buying) झाले आहे असे लक्षात येताच त्या अतिक्रमणावर आपण तत्काळ आक्षेप नोंदविला गेला पाहिजे. काही वेळा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण याचा त्रास आपल्याला भविष्यात होऊ शकतो मग अशा प्रकरणात आपल्याला न्याय मिळण्याची शक्यता ही फार कमी प्रमाणात पहावयास मिळते.
अतिक्रमणाबाबत तक्रार ही आपल्या गटाच्या जमिनीच्या पुराव्यानिशी अलिखित स्वरुपात करावी, तसेच तक्रार अर्जाची दुय्यम प्रत तक्रार रजि. नंबरसह आपल्या जवळ तक्रार केल्याचा पुरावा म्हणून ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात न्याय मिळवण्यासाठी ते उपयोगी पडते. आपण पोलीस स्टेशनमध्ये अतिक्रमण संदर्भात तक्रार अर्ज सादर करणे आवश्यक असते किंवा आपणास पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावयाची नसेल अशा वेळी कोर्टामध्ये आपण दिवाणी दावा व मनाई हकूम मिळणेबाबतचा दावा दाखल करणे आवश्यक असते.
आपणास हा प्रश्न पडला असेल मनाई हुकूम म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मनाई हुकूम म्हणजेच असा हुकूम किंवा आदेश की जो एका व्यक्तीला अगर संस्थेला ते करीत असलेल्या कृत्य करू नये अथवा त्यांनी विशिष्ट कृती करावी असा आदेश हुकूम म्हणजे मनाई हुकूम या मनाई हुकुमाचे विविध प्रकार पडतात.
मनाई हुकुमाचे प्रकार जसे की तात्पुरता मनाई हुकूम, कायमस्वरूपी मनाई हुकूम, प्रतिबंधात्मक मनाई हुकूम, अंतरिम मनाई हुकूम, अनिवार्य मनाई हुकूम हे आहेत. दिवाणी न्यायालय अशा प्रकरणावर सुनावणी घेते. सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून सदर प्रकरणावर निर्णय दिला जातो. न्यायालयाने दिलेल्या मनाई आदेशाचे कोणीही उल्लंघन केल्यास कठोर आर्थिक दंड आणि अगदी तुरुंगवासही होऊ शकतो.
- अॅड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे, कायदे अभ्यासक तथा मोडी लिपी लिप्यंतरकार, पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन प्रमाणित