Join us

Jamin Kharedi : शेत जमिनीच्या ताब्यावरुन किंवा बांधावरून वाद झाल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 19:16 IST

Jamin Kharedi : या प्रकरणात प्रांताधिकारी हे संबंधित दोन्ही बाजुच्या पक्षकरांना नोटीस देऊन बाजू मांडण्यासाठी बोलावतात, आणि..

Jamin Kharedi : भू धारकांमध्ये शेत जमिनीच्या ताब्यावरुन किंवा बांधावरून जर वाद निर्माण होत असतील तर अशावेळी वादग्रस्त जमिनीची मोजणी ही भूमी अभिलेख कार्यालयाकडून (Bhumi Abhilekh Karyalay) करून घेऊ शकतो. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे जमीन मोजणीच्या फीसह आपणास मोजणी करून देण्याबाबत अर्ज सादर करावा लागतो.

वादग्रस्त जमिनीची मोजणी (Jamin Mojani) ही भूमी अभिलेख कार्यालयाकडून केल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी केलेल्या जमिनीचा नकाशा मिळतो. या नकाशात अतिक्रमण झालेल्या शेत जमिनीचे क्षेत्र आणि संपूर्ण जमिनीच्या क्षेत्राचा (jamin Kharedi) उल्लेख केलेला असतो. या नकाशावर तुमच्या जमिनीची सर्व बाजू दाखविल्या जातात आणि त्याचबरोबर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले क्षेत्रसुद्धा दाखविले जात असते. एकदा मोजणी झाल्यानंतर दुबार मोजणीसुद्धा करता येते.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कायदेशीर तरतुदीनुसार आपणास दावा सादर करता येतो. उपविभागीय अधिकारी किंवा प्रांताधिकारी यांच्याकडे रीतसर अर्ज सादर करता येतो. अर्जासोबत आपण जमिनीशी निगडित सर्व कागदपत्रे उदा. मोजणी नकाशा (प्रथम, दुबार), सात बारा उतारा, जमिनीच्या चतुः सिमेचा दाखला, आठ-अ उतारा इत्यादी कागदपत्रे जोडलेली असावीत. 

या प्रकरणात प्रांताधिकारी हे संबंधित दोन्ही बाजुच्या पक्षकरांना नोटीस देऊन बाजू मांडण्यासाठी बोलावतात, त्यानंतर अतिक्रमणाबाबत बाबी तपासल्या जातात व त्यानुसार कायद्याच्या अनुषंगाने योग्य तो न्यायनिर्णय दिला जातो. काही प्रकरणात असेही घडले आहे की न्याय निर्णय देऊनसुद्धाही अतिक्रमण करणारा भूधारक हा सदर जमिनीचा ताबा सोडत नाही, अशावेळी न्याय मिळवण्यासाठी जमीन मालकाला न्यायालयात दावा दाखल करावा लागतो.

कोर्ट कमिशन मोजणी म्हणजे काय?जर सदर शेजारील शेतकऱ्यांकडून जमिनीचा बांध कोरला जात असेल तर न्यायालयाच्या माध्यमातून सदर शेजारील शेतकऱ्यावर कायमस्वरूपी मनाई आदेश बजावला जाऊ शकतो. याशिवाय न्यायालयाकडून जमिनीची मोजणी देखील मागितली जाऊ शकते. 

सर्वांत प्रथम आपणास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल, त्यानंतर दोन्हीही बाजूचे म्हणजेच वादी व प्रतिवादी यांचे म्हणणे जाणून घेतले जाते. कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय देण्यासाठी कोर्ट कमिशनद्वारे अधिका-यांची नेमणूक करून मोजणीसाठी पाठविले जाते. 

कोर्ट कमिशन प्रकरणात न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या अभिलेखाप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे किंवा तातडीच्या मोजणीच्या दराने मोजणी फी आकारली जाते. दुसऱ्याच्या जमिनीत घुसखोरी/अतिक्रमण करणे हा गुन्हा आहे या गुन्ह्याबाबत आपण रीतसर तक्रार करू शकता. अशाप्रकारे अवैधरित्या अतिक्रमण केलेल्या जमिनीवरील अवैध ताबा किंवा जमीन बांधबाबत आपण कायद्याचा उपयोग करून कब्जा किंवा अतिक्रमण हटवता येते.

- अॅड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे, कायदे अभ्यासक तथा मोडी लिपी लिप्यंतरकार, पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन प्रमाणित

Jamin Kharedi : जमिनीवर अतिक्रमण झाल्यास कुठे आणि कशी तक्रार कराल? वाचा सविस्तर

टॅग्स :जमीन खरेदीशेती क्षेत्रशेतीशेतकरी