Join us

Sugarcane Farming : ऊस पीक वाढीसाठी आंतरमशागतीची 'ही' कामे कराच, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:23 IST

Sugarcane Farming : उसाची उगवण झाल्यावर पीक वाढीसाठी  (Intercropping works for sugarcane crop) आंतरमशागतीच्या कामांचा समावेश होतो.

Sugarcane Farming : उसाची उगवण झाल्यावर पीक वाढीसाठी  (Intercropping works for sugarcane crop) नांगे भरणे, तण नियंत्रण, जमीन भुसभुशीत करणे, वरखते देणे, तगरणी  किंवा बाळ बांधणी करणे व मोठी बांधणी करणे, इ. आंतरमशागतीच्या कामांचा समावेश होतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात... 

1) नांगे भरणे : ऊसाची  उगवण होऊन दोन रोपात ३५ ते ६० सें.मी. पेक्षा जास्त अंतर असल्यास त्या ठिकाणी पाटात लावलेल्या रोपांचा वापर करून नांगे भरावेत. 2) तण नियंत्रण : उगवणीनंतर एक खुरपणी करून उसाच्या ओळीमध्ये ४५ दिवसांनी हेक्टरी ५ टन पाचटाचे आच्छादन केल्यास तणांची वाढ होत नाही, ओलावा टिकून राहतो व जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडते. खुरपणीनंतर उसात दातेरी कोळपे चालवल्यास तणांचा बंदोबस्त होतो. ॲट्राझीन हेक्टरी ५ किलो किंवा मेट्रीब्युझीन हेक्टरी १.५ कि. ६०० लिटर पाण्यात मिसळून वाफसा अवस्थेत, लागवडीनंतर एका आठवड्यात फवारल्यास तणांचा बंदोबस्त होतो. 3) जमीन भुसभुशीत करणे : लागवडीनंतर ३ ते ३।। महिन्याच्या काळात दातेरी कोळपे, कृषीराज, लोखंडी नांगर, कुळव या अवजारांचा वापर करून जमीन भुसभुशीत करावी. 4) वरखते : पीक ६ ते ८ आठवड्याचे झाल्यानंतर नत्राचा दुसरा हप्ता कृषिराज अथवा लाकडी नांगराने पेरून द्यावा अथवा नत्र खत सरीमध्ये देऊन दातेरी कोळपे चालवावे. 5) बाळबांधणी : पीक ३ ते साडे तीन महिन्याचे झाल्यावर नत्राचा तिसरा हप्ता देऊन हलकी तगरणी (बाळबांधणी) करावी. त्यासाठी लोखंडी नांगराने उसाच्या बुंध्यास भर  दिल्याने खत जमिनीत चांगले मिसळण्यास मदत होते. 6) मोठी बांधणी : पीक साडे चार ते ५ महिन्याचे, २ ते ३ कांड्या सुटण्याच्या अवस्थेत पक्की किंवा मोठी बांधणी करावी. सुरुवातीला लोखंडी नांगराने संपूर्ण वरंबा फोडून घ्यावा. सायन कुळवाने माती भुसभुशीत करावी. रिजर चालवून वरंब्याच्या ठिकाणी सरी पाडून बुंध्यास मातीची भर लावावी. वरखताचा शेवटचा हप्ता द्यावा.

-  डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ

टॅग्स :ऊसशेतीशेती क्षेत्रकृषी योजना