Gulabi Bond Ali : कापूस पिक हे सध्या ४० ते ५० दिवसाचे झाले असुन बऱ्याच ठिकाणी फुलावर येत आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोंमकळयाच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयापासुनच दिसुन येतो. सततचे ढगाळ वातावरण पिकावरील किडींना पोषक असते.
किडीच्या व्यवस्थापनामथे उशिर केल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढण्याची शक्यता असते म्हणुन सुरूवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन करून हया किडीमुळे होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते.
खालील उपाययोजनेचा अवलंब करावा.
- पिकातील डोमकळया नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढयांची रोकथाम करता येईल.
- दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझेतिरेक्टिन ३०० पीपीएम ५० मिली किंवा १५०० पीपीएम २५ मिली प्रति १० ली पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसानंतर पिकामध्ये कामगंध सापळ्याचा वापर करावा.
- पिकाव्या वाढीव अवस्थेच्या उंचीनुसार किमान एक फुट अंतर ठेवावे जेणेकरून कामगंध सापळयाव्या प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल.
- यासाठी एकरी दोन कामगंध सापळे लावावे.
- सतत तीन दिवस या सापळयामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.
- तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावे.
- पिक उगवणी नंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबैक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मिश्र किटकाची १.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी सहा वेळा सोडावे.
- गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापन साठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनीधीत्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडांची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी.
- प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली सांगीतल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.
- इंडोक्साकार्ब १४.५० टक्के एससी १० मिली किंवा स्पिनेटोराम ११.७० टक्के एससी ९ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के इसी ३० मिली किंवा विचनॉलफॉस २० टक्के एएफ २५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० टक्के इसी २५ मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जेथे प्रादुर्भाव १० टक्क्यांच्यावर आहे, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये, म्हणून इमामेक्टीन बेन्झोएट १.५ टक्के प्रोफेनोफॉस ३५ टक्के डब्ल्युडीजी १४ ग्रॅम किंवा सार्यट्रानिलीप्रोल ८ टक्के + डायफेनथ्युरॉन ४० एससी १३ मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन ५ टक्के २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट १.१ टक्के डायफेनथ्युरॉन ३० एससी २० मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० फेनप्रोपेथ्रिन ५ टक्के इसी ३० मिली या पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- डी. बी. उंदिरवाडे, विभाग प्रमुख, किटकशास्त्र विभाग डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला