Grape Farming : सध्याच्या कालावधीमध्ये बागा काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात असतील. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरडछाटणी झालेल्या बागेत यावेळी काडी परिपक्व होऊन वेलीचा या शेवटच्या टप्प्यातील विश्रांतीचा कालावधी मानला जातो.
या बागेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात फळछाटणी सुरुवात होणे अपेक्षित आहे. यासाठी काडी परिपक्वता पूर्ण झालेली असावी. काडी परिपक्वतेकरिता पुढील उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
काडी परिपक्वतेची समस्या
- बागेत पाणी पूर्णपणे बंद करणे.
- पालाशयुक्त खतांचा वापर ठिबकद्वारे (१ ते १.२५ किलो / एकर / दिवस) आणि फवारणीद्वारे (४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे) करणे.
- ठिबकद्वारे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये खते द्यावीत. ड्रीपर कमीत कमी वेळ चालू राहील, असे पाहावे.
- शेंडा पिंचिंग करणे महत्त्वाचे असेल.
- बगलफुटी निघालेल्या असल्यास त्या त्वरित काढून घ्याव्यात.
- फुटी काडीवर मोकळ्या राहतील, असे नियोजन करावे. असे केल्यास काडीवर पुरेसा सूर्यप्रकाश पडून त्यात लिग्नीन तयार होण्यास मदत होईल.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी