Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shenda Vadh : तुमच्याही द्राक्ष बागेत शेंडा वाढ जास्त प्रमाणात होतेय, जाणून घ्या नेमकं कारण अन् उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:23 IST

Shenda Vadh : बऱ्याच बागेत पावसाळी वातावरणामुळे शेंडावाढ जास्त प्रमाणात दिसून येते. हे नेमके कशामुळे होते?

Shenda Vadh :  बऱ्याच बागेत पावसाळी वातावरणामुळे (Rainy Season) शेंडावाढ जास्त प्रमाणात दिसून येते. यावेळी वेलीमध्ये सायटोकायनीनचे प्रमाण कमी होऊन जिबरेलिन्सची मात्रा जास्त वाढते. यामुळे शाकीय वाढ तितक्याच जोमाने होताना दिसते. परिणामी पेऱ्यातील अंतर वाढते, बगलफुटी जोमात निघणे व शेंडावाढ जास्त होणे, इत्यादी बाबी दिसून येतील. 

वाढत असलेल्या कॅनोपीमुळे (Grape Canopy Management) पुढील भागात गर्दी निर्माण होईल. जसजशी काडी तळापासून बारा-तेरा डोळ्यांच्या पुढे जोमाने वाढू लागते, तशी तिची परिपक्वता लांबणीवर जाईल. अशी अपरिपक्व काडी कापून बघितल्यास ती पोकळ दिसेल. त्यात कापसासारखा द्रव जमा झालेला दिसेल. या काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा मुळीच राहत नाही. पुढील काळात फळछाटणी केल्यानंतर त्या डोळ्यामधून फक्त गोळीघड बाहेर पडेल किंवा त्याचे रूपांतर बाळीमध्ये होईल. 

हे उपाय करता येतील शेंड्याकडे निघालेल्या नवीन फुटीवर रोगांचा प्रादुर्भाव सहजपणे वाढेल. यासाठी शेंडा पिंचिंग करण, बगलफुटी काढणे, फुटी तारेवर बांधून घेणे इत्यादी उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील. पोषक वातावरण असल्यामुळे रोगनियंत्रणासाठी जैविक नियंत्रकांचा वापर फायद्याचा राहील. ट्रायकोडर्मा ५ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे चार दिवसांच्या अंतराने तीन-चार फवारण्या करून घ्याव्यात. यार्साबत ट्रायकोडर्मा ५ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे दहा दिवसांच्या अंतराने चार-पाचवेळा ड्रेचिंग करून घ्यावे. 

शेंड्याकडील फूट अनावश्यक असल्यामुळे या फुटीवर काडी परिपक्वतेच्या काळात बोर्डो मिश्रण ०.७५ टक्के (कोवळी काडी असल्यास) ते १ टक्के (काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात) याप्रमाणे एक-दोन फवारण्या करता येतील. यामुळे कोवळ्या फुटीवर स्कॉर्निंग येऊन ही पाने प्रकाश संश्लेषणास सक्षम राहणार नाहीत. परिणामी वाढ नियंत्रणात राहून अन्नद्रव्यांचे नुकसान टळेल. 

अशी फवारणी करा जमिनीत पाणी साचलेल्या स्थितीत काडी परिपक्वतेसाठी अन्नद्रव्यांची उपलब्धता ठिबकद्वारे न करता फवारणीद्वारे करावी. ०-०-५० चार-पाच ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे दोन-तीन फवारण्या करून घ्याव्यात. वाफसा आल्यानंतर ठिबकद्वारे ०-०-५० १.२५ किलो प्रतिएकर याप्रमाणे आठ-दहा दिवस उपलब्धता करावी. एस.ओ.पी सोबत मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो, फेरस सल्फेट ६-८ किलो जमिनीतून द्यावे.

- ग्रामीण कृषी मौसम आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :द्राक्षेपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रशेती