Grape Farming : द्राक्ष बागेत काडीची परिपक्वता सुरू झाली असेल किंवा शेवटच्या टप्प्यात असेल. यावेळी परिपक्व काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा होण्यासाठी पाने सशक्त असणे गरजेचे आहे. या कालावधीत पावसामुळे जमीन वाफशामध्ये राहत नाही. वेलीची जोमाने होणारी वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी बागायतदार वाढरोधकांचा, बुरशीनाशकांचा आणि खतांचा अधिक प्रमाणात वापर करतात.
काडीची परिपक्वता ही कोणत्याही खताची किंवा वाढरोधकाची फवारणी करताच लगेच मिळेल असे नाही. या प्रक्रियेसाठी काही ठरावीक काळ जाणे आवश्यक असते. या गोष्टीचा विचार न करता शेतकरी एकामागून एक फवारण्या करत राहतात. फवारणी करतेवेळी शिफारस केलेल्या मात्रेकडे दुर्लक्ष करून अधिक प्रमाण व जास्त फवारण्या घेतल्या जातात.
यामुळे पानांमधील पेशींवर दाब निर्माण होऊन त्यावर जखम होते. काही दिवसांत पानावर स्कॉचिंग दिसून येते. जास्त प्रमाणात फवारणी केलेल्या परिस्थितीत पाने जळाल्यासारखी दिसून येतात. रंगीत द्राक्ष जातीमध्ये कॉपरयुक्त बुरशीनाशकांच्या फवारण्या जास्त प्रमाणात होत असल्यामुळे 'टॉक्सिसिटी' दिसून येते. या जळालेल्या पानामध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे पुढील प्रक्रिया थांबते.
अशी पाने अन्नद्रव्यांचा साठा करू शकत नसल्यामुळे पानावर ताण येऊन ती गळून पडतात. यानंतर काड़ी उघडी पडल्यामुळे डोळेसुद्धा फुगतात. नाइलाजास्तव फळछाटणी लवकर घ्यावी लागते. यावर पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील. काडी परिपक्वतेच्या कालावधीमध्ये शक्यतो पालाशची उपलब्धता जमिनीतूनच करावी.
पाऊस कमी-अधिक प्रमाणात असल्यास जमीन वाफशामध्ये राहील, असे पाणी नियोजन करावे. वाढरोधकांची, खतांची व बुरशीनाशकांची फवारणी करायची झाल्यास, ती स्वतंत्रपणे करावी. शिफारस केलेल्या घटकांचा शिफारशीत मात्रेमध्ये वापर करावा. शक्यतो फवारणी उन्हामध्ये करणे टाळावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी