Join us

द्राक्ष ओलांड्यावर मुळे कसे तयार होतात? त्यावर उपाय काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:11 IST

Grape Farming : पावसाळी परिस्थितीत भारी जमिनीमध्ये वाफसा मिळणे शक्य नाही. त्याचा विपरीत परिणाम वेलीच्या मुळांच्या वाढीवर दिसून येईल.

Grape Farming :  पावसाळी परिस्थितीत भारी जमिनीमध्ये वाफसा मिळणे शक्य नाही. त्याचा विपरीत परिणाम वेलीच्या मुळांच्या वाढीवर दिसून येईल. अशावेळी बोद खोदून पाहील्यास मुळे काळी पडलेली दिसून येतात. 

मुळाचा शेंडा काळा पडून सडल्याप्रमाणे दिसून येतो. यामुळे वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली व्यवस्थित होणार नाहीत. परिणामी शेंडा पूर्णपणे थांबलेला दिसेल. पाने पिवळी पडतील. काहीवेळा पानगळ होतानाही दिसून येईल.

बऱ्याचदा आपण खते व पाणी वेलीला दिले नसले तरी ती वेल जमिनीत उपलब्ध घटकांचा वापर करून वाढ करून घेण्याचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे जमिनीतील मुळे कार्यक्षम नसल्याच्या परिस्थितीतही वेल आपला बचाव करण्यासाठी वेलीच्या काडी, ओलांडा, खोडांवरील भागांवर मुळे तयार करते. 

जमिनीत जोपर्यंत पाणी साचलेले आहे, तोपर्यंत वेलीवर तयार झालेली ही मुळे कार्य करून आपली गरज पूर्ण करते. जमीन वाफश्यात आल्यावर पुन्हा बोदात थोडे खोदून मुळे तपासल्यास पांढरी मुळे तयार होताना दिसतील.

एरियल मुळांचे फारसे विपरीत परिणाम दिसत नाहीत. मात्र वरील मुळे सुकणे व जमिनीतील मुळे तयार होण्यातील कालावधी जास्त राहिल्यास घडाच्या विकासात किंवा काडीमध्ये अन्नद्रव्य साठविण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. 

ही समस्या कमी करण्यासाठी भारी जमीन असलेल्या किंवा पाणी साचून राहणाऱ्या बागेत काडी परिपक्वतेच्या कालावधीत दोन ओळींमध्ये नांगराने एक छोटी चारी घेतल्यास बोद किंवा मुळाच्या कक्षेतील पाणी वेळीच निघून जाईल. वाफसा लवकर येईल. ही पाणी साचण्याची स्थिती टाळण्यासाठी द्राक्ष लागवडीपूर्वीच बागेला दोन ते तीन टक्के उतार देण्याची शिफारस आहे.

हेही वाचा :  मका आणि बाजरीची पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल अन् कशी? वाचा सविस्तर

टॅग्स :द्राक्षेशेतीशेती क्षेत्रपीक व्यवस्थापन