Join us

Turmeric Harvesting Machine : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवीन हळद काढणी यंत्र, काय आहेत वैशिष्ट्ये  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 14:37 IST

Agriculture News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्र विकसित केल्याने मनुष्यबळाचा प्रश्न सुटणार आहे.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (PDKV) ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्र विकसित केल्याने मनुष्यबळाचा प्रश्न सुटणार आहे. या यंत्राला वापरण्यासाठी समितीने मान्यता दिल्याने राज्यासह पश्चिम विदर्भात हळदीचा पेऱ्यात वाढ होण्यास आता मदत होणार आहे. शिवाय हळद काढणीसाठी लागणारा वेळ, मनुष्यबळाचा खर्च याची बचत होणार आहे. 

हळद फायदेशीर (Turmeric Crop) पीक आहे, तथापि काढणीसाठी एकूण पीक उत्पादनाच्या खर्चात जवळपास ३० ते ४० टक्क्यापर्यंत खर्च येत असल्याने शेतकर्‍यांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. अशा पिकाच्या काढणीसाठी सर्व पिकाच्या पीक वाढीच्या सर्व क्रियापेक्षा जवळपास आठपट मजूर जास्त लागतो. हळद पिकाची काढणी (Turmeric Harvesting machine) मजुरांच्या सहाय्याने केली जाते. या पिकाची व्यावसायिक उपयोगीता बघता हळद काढणी यंत्र प्रभावी ठरणार आहे. या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात शास्त्रज्ञ डॉ. विवेक खांबलकर यांनी हे यंत्र विकसित केले आहे.

सन २०१९-२० मध्ये देशात हळद पिकाखाली एकूण २.१८ लक्ष हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी ०.५५ लक्ष हेक्टर क्षेत्र फक्त महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र हे तेलंगणानंतर हळद पिकाखालील क्षेत्रानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. सन २०२१-२२ मध्ये राज्यात हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र सुमारे ८४०६६ हेक्टर होते. हळदीची लागवड आणि काढणीचे काम मोठे जिकरीचे आहे यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळही मिळणे कठीण होत असल्याने हळदीच्या लागवडीत हा मोठा खोडा होता. या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हळद काढणी यंत्र विकसित केले आहे. 

श्रम आणि वेळेची होणार बचतटॅक्टरचलित हळद काढणी यंत्रामुळे श्रम आणि वेळेची बचत होणार असून, हळद काढणी जलद होणार आहे. विशेष म्हणजे गादी वाफ्यावरील हळद काढण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. या यंत्राची कार्यक्षमता ९८.७२ टक्के एवढी आहे. या यंत्राची मजबूत आणि टिकाऊ बांधणी असून, वापरण्यास सुलभ आहे.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रअकोलाशेतकरी