Join us

Cotton Farming : कपाशी बीटी वाणांच्या अन्नद्रव्यांची गरज संकरित वाणांपेक्षा कितीपट असते? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 18:50 IST

Cotton Farming : कपाशीच्या बीटी वाणांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन (Cotton BT Seed) काळजीपूर्वक करणे हे जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

Cotton Farming :  कपाशीच्या बीटी वाणांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन (Cotton BT Seed) काळजीपूर्वक करणे हे या वाणांपासून जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. बीटी वाणांची अन्नद्रव्यांची गरज नेहमीच्या संकरित वाणांसाठीच्या अन्नद्रव्यांच्या शिफारसीच्या साधारणपणे सव्वापट असल्याने त्यांच्यासाठी खताच्या मात्राही सव्वापट वापरावयास हरकत नाही. मात्र खतांचा वापर (fertilizer) करण्यापूर्वी जमिनीचे माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे.         बागायती संकरित कापसासाठी (Bagayati Kapus) लागवडीच्यावेळी प्रति हेक्‍टरी २० किलो नत्र (४३ किलो युरिया), ५० किलो स्फुरद (३१३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५० किलो पालाश (८६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. लागवडीनंतर तीस दिवसांनी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) व पुन्हा लागवडीनंतर ६० दिवसांनी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) प्रति हेक्टरी द्यावे. 

कोरडवाहू देशी वाणांसाठी लागवडीच्यावेळी प्रति हेक्टरी १२.५ किलो नत्र (२७ किलो युरिया), ५० किलो स्फुरद (३१३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि २५ किलो पालाश (४३ किलो म्यूरेट ॲाफ पोटॅश) द्यावे. लागवडीनंतर ३० दिवसांनी प्रति हेक्टरी  २५ किलो नत्र (५४ किलो युरिया) द्यावा. बोंडे वाढीच्या काळात २ टक्के (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम) युरियाची पिकावर फवारणी करावी.

कोरडवाहू संकरित वाणांसाठी लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी २० किलो नत्र (४३ किलो युरिया), लागवडीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) द्यावा. बोंडे वाढीच्या काळात २ टक्के (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम) युरियाची पिकावर फवारणी करावी.

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ 

टॅग्स :कापूसपीक व्यवस्थापनखतेशेती क्षेत्र