Cotton Farming : कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. यामध्ये किडींचे सर्वेक्षण, जैविक नियंत्रण, आणि आवश्यकतेनुसार रासायनिक नियंत्रण यांचा समावेश होतो. सद्यस्थितीत रोप अवस्थेतील मुळकुज रोग व्यवस्थापन आणि मावा किडीचे व्यवस्थापन कसे करावे हे पाहुयात...
कपाशीतील रोप अवस्थेतील मुळकुज रोग व्यवस्थापन
- मुळकुज रोगग्रस्त रोपे ठिकठिकाणी आढळून येऊ शकतात.
- सुरुवातीच्या लक्षणांनुसार रोपांना १ किलो ट्रायकोडर्मा व्हिरिडी अथवा ट्रायकोडर्मा हर्झियानम विरघळणारी पावडर किंवा द्रवरूप स्वरूपातील चांगल्या कुजलेल्या ५० किलो शेणखत किंवा कंपोस्टमध्ये मिसळून १ एकर क्षेत्रात जमिनीत मिसळावे.
- किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी @ १२ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून रोगग्रस्त ठिकाणी आळवणी (स्पॉट ड्रेंचींग) करावी.
- आळवणी करण्यासाठी तयार केलेल्या द्रावणाचे प्रमाण आळवणी करण्यासाठी मुळ्या ओल्या होतील एवढेच वापरावे.
कपाशीवरील मावा किडीचे व्यवस्थापनअंतर मशागत करून पिक तण विरहीत ठेवावे.नत्र खताचा संतुलीत वापर करावा.१० ते १२ चिकट सापळे प्रती हेक्टरी लावावेत.ढालकीडा व क्रायसोपा या मित्रकिटकाचे संवर्धन करावे.५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडीरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली प्रती १० लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
किटकनाशके | मात्रा (१० लि. पाणी) |
फ्लोनीकॅमीड ५०% डब्लूजी किंवा | ३ ग्रॅम |
थायमिथोक्झाम २५% डब्लूजी किंवा | २ ग्रॅम |
फिप्रोनील ५% एससी किंवा | ३० मिली |
बुप्रोफेजीन २५% एससी किंवा | २० मिली |
डिनोटेफुरन ७०% डब्लूजी किंवा | १.७४ ग्रॅम |
फिप्रोनिल १५% + इमिडाक्लोप्रिड ५% एससी किंवा | १० मिली |
फिप्रोनिल १५% + फ्लोनिकामिड १५% डब्ल्यूडीजी किंवा | ८ ग्रॅम |
अॅसीफेट ५०% + इमिडाक्लोप्रीड १.८% एसपी २० ग्रॅम
नोट : वरील कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक/साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. पायरेथ्रॉईड गटातील कीटकनाशकाची फवारणी नोव्हेंबर महिन्याअगोदर सुरु करू नये, यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो.
- पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प, किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी