Citrus Gummosis Disease : संत्रा बागांमध्ये सध्या एका गंभीर रोगाने थैमान घातले आहे. झाडांच्या खोडातून डिंकसारखा द्रव स्रवू लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. (Citrus Gummosis Disease)
डिंक्या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर संपूर्ण बाग धोक्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.(Citrus Gummosis Disease)
लिंबवर्गीय फळपिकांवरील डिंक्या रोग : कारणे, लक्षणे व प्रभावी व्यवस्थापन
संत्रा, मोसंबी, लिंबू यांसारखी लिंबवर्गीय फळपिके शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार आहेत.
मात्र, अलीकडील काळात या पिकांवर डिंक्या (Gummosis) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.
विशेषतः सध्या हा रोग अधिक तीव्र स्वरूप धारण करतो आणि झाडांच्या वाढीवर तसेच उत्पादनावर गंभीर परिणाम करतो.
डिंक्या रोगाची लक्षणे
डिंक्या रोगामध्ये झाडाच्या खोडावर किंवा फांद्यांवर भेगा पडून त्यातून चिकट, तपकिरी रंगाचा डिंकसारखा द्रव स्रवतो.
कालांतराने त्या भागातील साल सडते, झाड कमकुवत होते आणि उत्पादनात मोठी घट येते. रोग वाढल्यास झाड वाळण्याचीही शक्यता असते.
रोगाची प्रमुख कारणे
हा रोग प्रामुख्याने बुरशीजन्य (फंगल) संसर्गामुळे होतो. सतत ओलावा, पाण्याचा निचरा न होणारी जमीन, जास्त पाऊस, तसेच झाडाच्या खोडाशी सतत पाण्याचा संपर्क ही रोगवाढीस कारणीभूत ठरतात.
डिंक्या रोगाचे व्यवस्थापन
डिंक्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी खालील उपाय प्रभावी ठरतात.
* रोगप्रतिकारक वाणांची लागवड करावी.
* लागवड नेहमी चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत करावी. रोगग्रस्त फांद्या छाटून नष्ट कराव्यात.
* झाडाच्या बुंध्याशी सतत पाण्याचा संपर्क होणार नाही, याची काळजी घ्यावी.
* चिखल, चिकणमाती किंवा दलदलीच्या जमिनीत लागवड टाळावी.
रासायनिक उपाय
* डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच खालीलप्रमाणे फवारणी करावी
* मेटालॅक्सिल २.५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा फोसाइल-एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून फवारणी करावी.
* गरजेनुसार १२ ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.
बोर्डो पेस्ट व बोर्डो मिश्रणाचा वापर
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर बोर्डो पेस्ट १% (१ किलो मोरचूद + १ किलो कळीचा चुना + १० लिटर पाणी) तयार करून झाडाच्या खोडावर जमिनीपासून ३ ते ४ फूट उंचीपर्यंत लावावी.
पेस्ट लावण्यापूर्वी रोगग्रस्त साले, डिंक व खराब भाग काढून खोड स्वच्छ करावे.
पावसाळ्यात किमान २ ते ३ वेळा १% बोर्डो मिश्रणाची फवारणी (१ किलो मोरचूद + १ किलो कळीचा चुना + १०० लिटर पाणी) करावी.
डिंक्या रोग हा लिंबुवर्गीय फळपिकांसाठी अत्यंत घातक असून, वेळेवर योग्य व्यवस्थापन न केल्यास शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
योग्य निचरा, स्वच्छता, प्रतिबंधात्मक उपाय आणि शिफारस केलेल्या औषधांचा वापर केल्यास या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
(सौजन्य : फलोत्पादन पिकांतील किड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Web Summary : Gummosis threatens orange orchards. Identify symptoms like gum-like discharge. Manage it through disease-resistant varieties, proper drainage, and chemical treatments like metalaxyl or mancozeb sprays. Apply Bordeaux paste preventively. Timely action is crucial to prevent significant losses.
Web Summary : गोंद रोग संतरे के बागों के लिए खतरा है। गोंद जैसे स्राव जैसे लक्षणों को पहचानें। रोग प्रतिरोधी किस्मों, उचित जल निकासी और मेटलैक्सिल या मैनकोजेब स्प्रे जैसे रासायनिक उपचारों के माध्यम से इसका प्रबंधन करें। निवारक रूप से बोर्डो पेस्ट लगाएं। महत्वपूर्ण नुकसान को रोकने के लिए समय पर कार्रवाई महत्वपूर्ण है।