Seed Germination Test : खरीप हंगाम (Kharif Season) जवळ आला की शेतकऱ्यांची पेरणीची (Perni) लगबग सुरू होते. उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी बियाण्याची निवड हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो. अनेकदा शेतकरी बांधव दरवर्षी बाजारातून नवे बियाणे खरेदी (Biyane Kharedi) करतात.
परंतु, हे बियाणे महाग असतानाही त्याची उगवणक्षमता कितपत योग्य आहे, हे निश्चित नसते. अशा वेळी वेळ, श्रम आणि पैसा वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळेच ‘उगवणक्षम बियाणं’ वापरणे हा खरीप यशस्वी करण्याचा मूलमंत्र ठरतो.
उगवणक्षमता तपासणीच्या तीन सोप्या पद्धती -
गोणपाट वापरून तपासणी :
- प्रत्येक पोत्यातून थोडे बियाणे घेऊन एकत्र करा.
- १०० दाण्यांचे ३ नमुने तयार करा.
- ओल्या गोणपाटावर दाणे १०-१० च्या रांगेत लावा.
- वरून दुसरा ओला गोणपाट घाला आणि गुंडाळी करून सावलीत ठेवा.
- ६ ते ७ दिवसांनी उगवलेले दाणे मोजा.
- ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक उगवणक्षमता असल्यास बियाणे योग्य आहे, असे समजावे.
रद्दी पेपर वापरून तपासणी :
- रद्दी पेपरला चार घड्या घालून ओले करा.
- प्रत्येकी १० बियांच्या १० ओळी तयार करा (एकूण १०० बिया).
- गुंडाळ्या करून पिशवीत ठेवा.
- काही दिवसांनी अंकुर आलेल्या बिया मोजा.
- ७० टक्के किंवा अधिक बिया उगवल्यास बियाणे योग्य समजावे.
पाण्यात भिजवून त्वरीत तपासणी :
- १०० दाण्यांचे ३ संच तयार करा.
- ५ ते ७ मिनिटे पाण्यात ठेवा.
- टरफल सुरकुतलेले/फुगलेले दाणे वगळा.
- फुगलेले दाणे – खराब. टरफल शाबूत व सुरकुत्या नसलेले दाणे – चांगले.
- ७० टक्के किंवा अधिक दाणे चांगले असल्यास बियाणे वापरण्यास योग्य.
- जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक