Join us

बांबू लागवड योजनेसाठी असा करा अर्ज, ही कागदपत्रे आवश्यक, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:42 AM

अटल बांबू समृद्धी योजना "अंतर्गत चालू वर्षी बांबू लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शासनाने दि. 28 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयान्वये ,जुनी अटल बांबू समृद्धी योजना रद्द करून" नवीन अटल बांबू समृद्धी योजना "मंजूर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कडून," अटल बांबू समृद्धी योजना "अंतर्गत चालू वर्षी (2024 चा पावसाळा ) बांबू लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची गुगल फॉर्म लिंक यासोबत देण्यात येत आहे. तरी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने तात्काळ सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

अटल बांबू समृद्धी योजना शेतकऱ्यांना आधार देणारी आहे. या योजेनेसाठी लाभार्थ्यांची निवड करताना शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी, बांबू शेतकऱ्यांचा समूह, नोंदणीकृत संस्था इ.यातील सभासदांनी एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल, तदनंतर खाजगी शेतकऱ्याकडून एक एकट्या शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाईल. ऑनलाइन अर्ज सादर करताना अर्जासोबत आधार कार्ड, नवीन सातबारा उतारा, बँक पासबुकचे पहिले पानाची झेरॉक्स किंवा कॅन्सल केलेला चेक इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे अत्यावश्यक आहेत .

काय आहे ही योजना 

सदर योजनेअंतर्गत "टिशू कल्चर बांबू रोपे "पुरवठा व त्यांच्या देखभालीकरिता प्रत्येक शेतकऱ्याला 50% रक्कम एकूण रु.175 रुपये अनुदान म्हणून तीन वर्षात देण्यात येईल. सदर अनुदानाची विभागणी प्रथम वर्षात 90 रुपये, द्वितीय वर्षात 50 रुपये व तृतीय वर्षात रु.35 रुपये प्रतिरोप याप्रमाणे देण्यात येईल. पुरवठा करण्यात आलेल्या रोपांची रक्कम, अनुदानाच्या प्रथम वर्षीय हप्त्यातून समायोजित करण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला 2 हेक्टर क्षेत्राकरिता 600 रोपे प्रति हेक्टर ,याप्रमाणे एकूण 1200 बांबू रोपे (5 मी.×4 मी.) अंतरावर लागवड व देखभाली करिता अनुदान मूल्याकनानंतर वर्षाच्या शेवटी देण्यात येईल.ऑनलाइन अर्ज करताना तिथे नमूद केलेल्या सूचना, अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात. ऑनलाइन अर्ज भरताना आपल्या शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी ,बांबू शेतकऱ्यांचा समूह, नोंदणीकृत संस्था इ. यांचे नांव सुरुवातीलाच ऑनलाइन अर्जात "referred by "या  ठिकाणी स्पष्टपणे नमूद करावे.

निवड कशी होईल?  लागवडीसाठी कोणती बांबू प्रजाती निवडायची, याबाबत शेतकऱ्यांनी, तज्ञ जाणकाराकडून माहिती घेऊन स्वतः योग्य पद्धतीने प्रजातींची निवड करून, प्रजातीनिहाय संख्या ऑनलाईन अर्जात नमूद करावी. शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी, बांबू शेतकऱ्यांचा समूह, नोंदणीकृत संस्था यांचे  सभासदांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर अशा शेतकऱ्यांची यादी सविस्तर तपशिलासह , महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडे सदर संस्थेने लिखित स्वरूपात कळवणे अभिप्रेत आहे. अर्जदारांच्या कागदपत्रे तपासणीनंतर चालू वर्षी पावसाळ्यात महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कडून  टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी नाशिक वनवृत्त महाराष्ट्र बांबू विकास मंडळाशी संपर्क साधावा 

लिंक - अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.. 

 

टॅग्स :शेतीबांबू गार्डनपाऊसवनविभागशेती क्षेत्र