Agriculture News : सध्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) असून काही भागात ढगाळ हवामान तर काही भागात लख्ख ऊन पडले आहे.
अशा स्थितीत द्राक्ष बागेच्या काळजीसह आंबा बागेचे व्यवस्थापन कसे करता येईल किंवा या काळात या दोन्ही पिकांसाठी कोणती कामे करणे आवश्यक आहे, हे समजून घेऊया.
द्राक्ष पिकासाठी सल्ला
- फळछाटणीच्या अगोदर साधारणतः एक आठवडा काडीची प्रयोगशाळेतून तपासणी करून घ्यावी.
- त्यासाठी एक एकर बागेतून पाच-सहा ठिकाणांहून प्रत्येक जाडीच्या (७.८ मि.मी., ८-१० मि.मी. आणि १०-१२ मि.मी. सबकेन किंवा सरळ अशा प्रत्येक वर्गातील नऊ-दहा काड्या तळातून एक डोळा राखून काढाव्यात.
- या काड्या ओल्या गोणपाटात बांधून प्रयोगशाळेत पाठवाव्यात.
- तिथे सूक्ष्मदर्शकाखाली डोळे तपासणी होते. त्यावेळेपर्यंत काडी ओली राहणे गरजेचे आहे.
- डोळे तपासणी केल्याने छाटणीच्या त्रुटी टाळता येतात
आंबा पिकासाठी सल्ला
ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने पालवीचे निरीक्षण करावे. नवीन लागवडीमध्ये प्रादुर्भाव दिसून आल्यास कीडग्रस्त शेंडे, काड्या काढून किडीसह नष्ट कराव्यात. पालवीचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी, लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) २.५ मि.लि. अधिक स्टीकर स्प्रेडर ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी