- सुनील चरपेकापसाची लागवड वाढली तरी उत्पादनावर लाल्याचे संकट कायम आहे. थंडी, अन्नद्रव्यांची कमतरता आणि हवामानातील उलथापालथ यामुळे कपाशीची झाडे अचानक कमकुवत होतात आणि पाने लाल होऊन गळू लागतात. बहुतांश शेतकरी याला रोग मानतात, पण मुळात ही पोषणातील कमतरतेची गंभीर चेतावणी असते. अतिपाऊस, ढगाळ वातावरण, मध्येच पाण्याचा ताण, थंडी, मॅग्नेशियम व बोरोनची कमतरता यामुळे उत्पादन घटते. योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, वेळेवर फवारणी आणि मातीचे तापमान सांभाळणे या उपायांनीच कपाशीचे पीक व कापसाचे उत्पादन सुरक्षित ठेवता येते.
या वर्षी राज्यात ३८ लाख ५२ लाख ५१७ हेक्टर, तर विदर्भात १६ लाख ८६ हजार ४८६ हेक्टर व मराठवाड्यात १२ लाख ५८ हजार ७३ हेक्टरमध्ये कापसाची पेरणी करण्यात आली आहे. कपासाचा पहिला वेचा होतो न होतो तोच कपाशीवर लाल्या जायला सुरुवात झाली.
परभणी, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांतील काही शेतकऱ्यांनी पहिल्या वेचाचा एकरी तीन क्विंटल कापूस घरी आणला आणि लाल्यामुळे कपाशीची झाडे खराब झाल्याने ती काढून त्या जागेवर हरभऱ्याची पेरणी केली आहे. ही समस्या मागील काही वर्षांपासून सातत्याने उद्भवत आली तरी त्यावर कोणत्याच कायमस्वरुपी उपाययोजना केली जात नाही.
बहुतांश शेतकरी लाल्याला रोग समजतात. पण, हा रोग नसून, ती अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडांमध्ये निर्माण झालेली विकृती आहे. कपाशीच्या झाडांच्या निकोप वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक या दुय्यम आणि जस्त व बोरॉन या सुक्ष्म अन्नद्रव्यांची नितांत आवश्यकता असते. ही सर्व अन्नद्रव्ये झाडांना पुरेशा प्रमाणात वेळीच मिळाली तर झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढून ती सुदृढ बनतात.
ही सर्व अन्नद्रव्ये मातीत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे की नाही, याची खातरजमा शेतकरी कधीच करीत नाहीत. पिकांना खते देताना शेतकरी नत्र, स्फुरद व पालाशवर अधिक भर देत असून, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे दुर्लक्ष करतात. सोबतच झाडांना स्वच्छ सूर्यप्रकाश, कोरडे हवामान, पुरेसे पाणी व मातीची वाफसा स्थिती अत्यंत अवश्यक असते.
यातील कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण झाल्यास किंवा हवामानात प्रतिकूल बदल झाल्यास झाडे कमकुवत होतात आणि त्याचे परिणाम फूल व फलधारणेसोबत उत्पादनावर होतो. झाडांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाली आणि त्याच काळात कडाक्याच्या थंडीमुळे मातीचे तापमान खालावले, तर झाडांची पाने लालसर होऊन गळतात. कपाशीचे संपूर्ण शेत लाल दिसत असल्याने शेतकऱ्यांनी याचे 'लाल्या' नामकरण केले आहे.
मॅग्नेशियम व बोरॉनची कमी व उपायस्वच्छ सूर्यप्रकाशामुळे झाडे प्रकाशसंश्लेषणाद्वारे पुरेसे अन्न तयार करतात. मॅग्नेशियम झाडांमध्ये हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. झाडांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाली तर आणि पानांच्या शिरा, नंतर पानांच्या कडा व पुढे संपूर्ण पान लाल होते.
कारण, पानांमधील हरितद्रव्य संपलेले असते आणि ते तयार करण्याची प्रक्रिया थांबलेली असते. बोरॉनच्या कमतरतेमुळे परागीकरणाची प्रक्रिया मंदावत असून, झाडांची फुले व बोंडे गळतात. यातून पिकांना वाचविण्यासाठी झाडांची पाने तपासण्यासाठी लिफ टेस्टिंग लॅब उभारणे व पिकावर वेळीच मॅग्नेशियम, बोरॉन व बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे.
मातीचे तापमानकडाक्याच्या थंडीमुळे मातीचे तापमान खालावत असल्याने झाडांची जमिनीतील अन्नद्रव्ये शोषून घेण्याची प्रक्रिया खूपच मंदावते. पानांमधील हार्मोनल असंतुलित होऊन कॅल्शियम, मॅग्नेशियम व बोरॉन या घटकांचे शोषण घटते.
त्यातून लाल्याची समस्या निर्माण होत असल्याने अशा परिस्थितीत झाडांना हलके पाणी देणे किंवा जमिनीवर धूर करून मातीचे तापमान टिकवून ठेवणे गरजेचे असते. हवेतील अतिआर्द्रता व अधिक काळ सूर्यप्रकाशचा अभाव याही बाबी लाल्यास कारणीभूत ठरतात.
Web Summary : Cotton reddening isn't a disease, but nutrient deficiency caused by weather changes. Manage soil, nutrients, and temperature for healthy crops.
Web Summary : कपास का लाल होना रोग नहीं, बल्कि मौसम के बदलाव से पोषक तत्वों की कमी है। स्वस्थ फसलों के लिए मिट्टी, पोषक तत्वों और तापमान का प्रबंधन करें।