Join us

कापूस लागवड करतांना या गोष्टींची ठेवा जाण; उत्पन्नाची वाढेल हमी पिकांची असेल शान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 4:22 PM

कापूस लागवड पूर्वतयारी नियोजन विषयी कृषी तज्ञांचा सल्ला

कापूस हे महाराष्ट्रातील तसेच विदर्भातील महत्वाचे नगदी पिक असून देशाच्या ५०१ किलो ग्रॅम रुई प्रति हेक्टरी उत्पादकतेच्या तुलनेत महाराष्ट्राची उत्पादकता ३४९ किलो ग्रॅम प्रति हेक्टरी आहे.

महाराष्ट्राची उत्पादकता कमी असण्याची प्रमुख कारणे

१) हलक्या जमिनीत कापसाची लागवड, २) सुधारित तंत्राच्या वापराचा अभाव, ३) रासायनिक खताचा अपुरा व अयोग्य व्यवस्थापन, ४) प्रति एकरी रोपांची संख्या योग्य न ठेवणे, ५) सिंचनाचा अभाव, ६) मोसमी पावसाचा लहरीपणा आणि अनिश्चितता, ७) दरवर्षी विविध किडी व रोगांमुळे होणारे नुकसान इत्यादीचा समावेश होतो.

सध्या सर्वत्र शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून येणा-या खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खते तसेच इतर निविष्ठा खरेदीचे नियोजन शेतक-यांनी सुरु केले आहे. त्या दृष्टीने कापूस पिकाचे योग्य नियोजन करून कापूस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळण्याकरिता आणि कपाशीची गुणवत्ता टिकवून ठेवण्याकरिता कापूस पिकाच्या संपूर्ण कालावधीत शेतीच्या कामाचे नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.

बी.टी. कापसाच्या वाणांची निवड करतांना अधिक उत्पादन देणारे अनेक वाण बाजारात उपलब्ध असून त्यांची गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापनानुसार लागवड केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल. वाण निवडतांना विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. वाणाची निवड करतांना खालील बाबीचा विचार करावा.

१) आपल्या भागात उत्पादनास सरस असणारा वाण निवडावा २) आपण निवडणारा वाण रस शोषण करणा-या किडींना प्रतिकारक्षम संकरित असावा. ३) पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा ४) मान्यताप्राप्त वाणाचीच खरेदी करावी. बिल व पॅकेट जतन करून ठेवावे. ५) बागायती लागवडीसाठी मध्यम (१६० ते १८० दिवस) ते दीर्घ (१८० दिवसापेक्षा अधिक) कालावधीचे वाण निवडावे. ६) कोरडवाहू लागवडीसाठी लवकर (१५० ते १६० दिवस) किंवा मध्यम (१६० ते १८० दिवस) कालावधीत तयार होणारे वाण निवडावे.

दीर्घ कालावधीच्या वाणांची निवड शक्यतो करू नये. वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील स्वतःचा अनुभव तसेच आपण स्वतः अन्य शेतक-यांच्या शेतावरील पिक पाहून बी.टी. कपाशीच्या वाणाची निवड करण्यात यावी.

कापूस लागवड पूर्व नियोजन करतांना महत्वाच्या टिप्स पुढील प्रमाणे

१) मे महिन्यात जमीन मशागतीवर भर द्यावा. कोरडवाहू पिकाकरीता तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी. आणि बागायती कपाशी लागवडीकरिता अगोदरचे पिक निघाल्यानंतर त्वरित २० ते २५ से.मी. खोलवर नांगरणी करावी.

२) जमिनीच्या नांगरणीनंतर उभी-आडवी वखरणी करावी हि सर्व मशागती कामे उताराला आडवी करावी. जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखरणीपूर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत शेतात समप्रमाणात पसरून टाकावे.

३) खरीप पिकाचा नियोजनाचा आराखडा तयार केल्यानंतर कपाशीसाठी आवश्यकतेनुसार लागणारे बी.टी. तसेच सुधारित व सरळ वाणांचे बियाणे, रासायनिक खते, बीज प्रक्रियेसाठी लागणारे जीवाणू कल्चर व बुरशी नाशके यांची जुळवाजुळव करून ठेवावी.

४) बागायती कपाशी ठिबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिबक संचाची मांडणी तसेच विद्राव्य खत संच (FARTIGATION) यांचे योग्य नियोजन करावे.

५) बोंड अळीचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्व हंगामी कपाशीची लागवड टाळावी.

६) बागायती कपाशीची लागवड जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मान्सूनचा पेरणी योग्य म्हणजेच तीन ते चार इंच पाऊस पडल्यानंतरच करावी. १५ जुलै नंतर कापूस पिकाची लागवड करू नये.

७) मागील वर्षी ज्या शेतात सोयाबीन, मुग, उडीद, तूर किंवा ज्वारी यासारखी पिके घेतली त्या शेतात पिक फेरपालट म्हणून कपाशीची लागवड करावी.

८) मराठवाडा भागामध्ये कोरडवाहू बी.टी. कपाशीसाठी लागवड १२० X ४५ से.मी. अंतरावर करावी तसेच बागायती लागवडीसाठी १५० X ३० से.मी. किंवा १८० × ३० से.मी ठेवल्यास चांगले उत्पादन मिळते.

९) कापूस लागवड करतांना चवळी, मका, झेंडू या पिकाची सापळा पिक म्हणून मुख्य कापूस पिकाभोवती एक ओळ किंवा खाडे झालेल्या ठिकाणी सापळा पिकांची टोकन करावी.

१०) मध्यम ते भारी जमिनीमध्ये अधिक आर्थिक मिळकतीकरिता शिफारशीनुसार प्रभावी आंतरपीक पद्धतीमध्ये कापूस अधिक मुग (१:१) किंवा कापूस अधिक उडीद (१:१) किंवा लवकर येणा-या सोयाबीन जाती (१:१) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. तसेच कपाशी अधिक ज्वारी अधिक तूर अधिक ज्वारी (६:१:२:१) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा तसेच कपाशीच्या आठ ते दहा ओळीनंतर तूर पिकाचे आंतरपीक घ्यावे.

११) शेतक-यांनी नॉन बी.टी. (रेफ्युजी) कपाशीची लागवड बी.टी. कपाशी सभोवताली आवर्जून करावी. नॉन बी.टी. कपाशीची लागवड करीत असल्यास गाउचो या कीटकनाशकाची बीजप्रक्रिया ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात करावी.

१२) कोरडवाहू बी.टी. वाणांसाठी ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टर आणि बागायती कपाशीकरिता १२०:६०:६० किलो नत्र, स्फुरद, पालाश आणि अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी यावे. बागायती कपाशीमध्ये नत्र तीन वेळा विभागून द्यावे. स्फुरदासाठी एस.एस.पी. चा वापर केल्यास त्यासाठी त्यातील १२ टक्के गंधकामुळे सरकीत तेलाचे प्रमाण वाढेल.

१३) कपाशीच्या पिकात तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात ७० ते ८० टक्के घट येऊ शकते. कपाशीमध्ये पिक व तण स्पर्धेचा कालावधी लागवडीपासून ६० दिवसापर्यंत असतो. यामुळे पेरणीपासून दोन महिन्यापर्यंत पिक तणमुक्त ठेवावे.

१४) कपाशीसाठी उगवणीपूर्व वापरावयाचे तणनाशक पेंडीमिथालीन ०.७८५ किलो ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी मात्रा २.५ लिटर प्रति हेक्टर किंवा २५ ते ३० मी. लि. प्रति दहा लिटर पाणी उगवणीपूर्व परंतु बियाणे उगवणीपूर्वी फवारणी करावी. या तणनाशकामुळे द्विदल वर्गीय तणांचे चार आठवड्यापर्यंत उत्तम रीतीने नियंत्रण होते.

१५) कपाशीसाठी उगवणीपश्चात तणनाशके यामध्ये पायरीथायोबॅक सोडीयम ६२.५ ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी मात्रा ६०० मिली प्रति हेक्टर किंवा १२ मी.लि. प्रति दहा लिटर पाणी-द्विदल वर्गीय तणांचे नियंत्रण नंतर क्यूझॉलफॉप इथाईल ५०.० ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी मात्रा ५०० मी. लि. प्रति हेक्टर किंवा १० मी.लि. प्रति १० लिटर पाणी- एकदल वर्गीय तणांचे नियंत्रण

१६) पाते लागणे, फुले लागणे, बोंड लागणे व बोंडे भरणे या अवस्थेत सिंचन करणे महत्वाचे आहे. कापूस पिकास पाते लागण्यापासून बोंडे लागण्यापर्यंत पाण्याची सर्वाधिक गरज असते.

१७) पिकास फुले-पाते-फुले गळ रोकण्यासाठी (एन.ए.ए) या संजीवकाची ३ मी.लि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात दोन ते तीन आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करवी. संजीवकाची फवारणी करतांना त्यात इतर कोणतेही रसायन मिसळू नये.

१८) आठवड्यातून एका वेळा कपाशीच्या शेतातील १२ ते १४ झाडांचे निरीक्षण करावे.

१९) रसशोषक किडीच्या व्यवस्थापनाकरिता पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.

२०) बोंड अळ्यांच्या सर्वेक्षणासाठी दोन कामगंध सापळे प्रति एकर शेतात उभारावेत. मोठ्या प्रमाणामध्ये नर पतंग जेरबंद करण्यासाठी हेक्टरी २० कामगंध सापळ्यांचा वापर करावा. बोंड अळ्यांच्या प्रकाराप्रमाणे विविध ल्युरचा वापर करावा व प्रत्येक महिन्यात या सापळ्यामधील ल्युर बदलावेत.

लेखक प्रा. संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर - ४२३७०३ 

टॅग्स :कापूसशेतीशेतकरीखरीपपीक व्यवस्थापनशेती क्षेत्र