Join us

कपाशीच्या पऱ्हाट्या बारीक करून जमिनीची सुपिकता वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 12:31 PM

कृषी विज्ञान केंद्राच्या विषयतज्ज्ञ डॉ. प्रियंका खोले यांचा मोलाचा सल्ला

शेतात पीक घेतले की शेतकऱ्यांचा कल हा त्या पीकाचे अवशेष जाळून टाकण्याकडे असतो. मात्र असे केल्याने मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते. परिणामी उत्पादन कमी, विविध किडींचा पिकांच्या बाल्य अवस्थेत प्रादुर्भाव असे प्रकार दिसून येतात. 

सेंदिय कर्ब हा शेतीचा आत्मा आहे. त्याचे प्रमाण जितके जास्त तितकी जमिनीत सुपीकता राहते. पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी ते शेतात गाडले तर त्यापासून उत्तम सेंद्रिय खत तयार होऊन जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते, असे प्रतिपादन कृषी अभियांत्रिकी कृषी विज्ञान केंद्राच्या विषयतज्ज्ञ डॉ. प्रियंका खोले यांनी केले.

नांदेड जिल्ह्यातील काटकळंबा (ता. कंधार) येथे आयोजित केलेल्या शेती दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काटकळंबा नाबार्ड व संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळीच्या माध्यमातून एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्प प्रगतीपथावर असून, विविध शेतीविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकरी पीक निघाले की पिकाचे अवशेष जाळून टाकतो.

या संदर्भात शेतकऱ्यांचे प्रबोधन करून जनजागृती करण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर चलित मोबाइल श्रेडर कापसाच्या पराट्या बारीक करणाऱ्या यंत्राचे प्रात्यक्षिक घेतले. 'यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जमिनीचे आणि पाण्याचे संवर्धन' या विषयावर डॉ. खोले यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा - तीन वर्षांतून एकदा माती नमुना तपासा; भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचे होईल विश्लेषण

टॅग्स :कापूसशेतीशेतकरीपीक व्यवस्थापन