१५ वर्षे संपूर्ण पाचट कुजवून उत्पादन वाढ मिळाली नाही व जमिनीखालील अवशेष कुजविल्यानंतर एकाच वर्षात ५०% उत्पादन वाढ मिळाली. आता अशी वाढ मिळविण्यात शेतकऱ्यांना किती पैसा खर्च करावा लागला, असा विचार केल्यास एक पैसाही खर्च न करता उत्पादनात मिळालेली अगदी फुकटात ही उत्पादन वाढ आहे.
आज शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. बाजारात उत्पादन जास्त मिळविण्यासाठी अनेक उत्पादने येत आहेत, परंतु, हे मार्ग सर्व खर्चिक आहेत. शेतकऱ्यांपुढे कमीत-कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे मार्ग येणे गरजेचे आहे.
मला प्रयोगातून ही बाब प्रथम ध्यानात आली. या संबंधित पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर आणखी माहिती समजली, जमिनीत दोन प्रकारचे सेंद्रिय कर्ब असतात. १) स्थिर व २) अस्थिर सेंद्रिय कर्ब. स्थिर म्हणजे, जमिनीत टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब तर अस्थिर म्हणजे संपून जाणारा अगर भारी व हलक्या दर्जाचे सेंद्रिय खत.
जो पदार्थ जलद कुजून त्याचे खत होते ते खत जमिनीत वापरल्यानंतर जलद संपून जाते. जो पदार्थ कुजण्यास जास्त वेळ लागतो. त्या पदार्थापासून जास्त जास्त चांगल्या दर्जाचे खत तयार होते. ते दीर्घकाळ जमिनीत टिकून राहून दीर्घकाळ जमिनीला सुपिकता देते.
आजपर्यंत शेतकरी समाज केवळ शेणखत व कंपोस्ट भोवतीच अडकला आहे. शेणखत टाकणे म्हणजे शेतीतील सर्वांत पवित्र गोष्ट आपण करीत असल्याचे समस्त शेतकरी वर्गात भावना आहे. यातून शेतकरी वर्गाला बाहेर काढणे गरजेचे आहे.
शास्त्रीय भाषेत याचे स्पष्टीकरण वेगळ्याभाषेत केले जाते. कुजणान्या पदार्थात किती कर्बाचे अणू बरोबर एक नत्राचा अणू आहे. यावरून मोजले जाते. याला कर्ब x नत्र गुणोत्तर असे म्हणतात. हे गुणोत्तर जितके कमी पदार्थ लवकर कुजतो, तितके जास्त तितका कुजण्याचा काळ वाढत जातो. हिरव्या नवीन पानाचे गुणोत्तर सर्वात कमी तर जुन्या काष्टमय भागाचे सर्वात जास्त. हे गुणोत्तर ४०-५० पासून वेगवेगळ्या भागात २००-४०० पर्यंत असू शकते.
इंग्रजीत याला 'सीएन रेशो' असे म्हणतात. सर्व सामान्य शेतकऱ्यांनी हलके भारी असे समजून घ्यावे. बाकी तांत्रिक भाग सोडून द्यावा. ऊस पट्यात ऊसानंतर फेरपालटसाठी जमिन नांगरल्यानंतर बायका खोडकी वेचून जळणाला घेऊन जात. पाचट कोणी नेल्याचे पाहिले आहे. का नाही? कारण चुलीत खोडक्यापाकडून जास्त उष्णता मिळते.
पाचटाकडून तशी मिळत नाही. उष्णता ही एक शक्ती आहे. ही शक्ती जितकी जास्त तितके त्या पदार्थापासून उत्तम दर्जाचे खत तयार होते. हे साधे सोपे विधान कोणत्याही सर्वसामान्य शेतकऱ्याला समजण्यासारखे आहे.
आपण शेणखत कंपोस्ट नेमके कशासाठी टाकतो याबाबत विचारले तर जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी असे कोणीही उत्तर देईल. या सुपिकतेमुळेच पिकाचे उत्पादन चांगले मिळते. इतकिच माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना आहे. मलाही शेतीची सुरवात केल्यानंतर २०-२५ वर्षे इतकिच माहिती होती. सुक्ष्मजीवशास्त्राचे अध्ययन केल्यानंतर हे शेणखत वापरून संपते कसे, परत परत का द्यावे लागते हे लक्षात आहे.
पिकाला अन्नद्रव्ये पुरवठा करणाऱ्या सुक्ष्मजीवांचे शरीरक्रिया प्रजोज्पादन व अन्नपुरवठा करणाऱ्या कामात सुक्ष्मजीव हे खत वापरून संपवितात. आपण आता वार्षिक बहुवार्षिक पैके घेऊन जास्त जास्त कृषि उत्पादन घेत असता अशा सेंद्रिय खतांचा वापर वाढविला तर एखादे पिक घेतल्यानंतर त्या पिकाचे उत्पादनासाठी जितका सेंद्रिय कर्ब वापरला तितका अगर त्यापेक्षा जास्त सेंद्रिय खत जमिनीला परत करणे गरजेचे आहे.
यांत्रिकीकरणानंतर बागायतीच्या सोयी झाल्यानंतर पिकासाठी वापर वाढत गेला. त्यामानाने अनेक कारणांनी जमिनीला परत करणे कमी कमी होत गेले. परिणामी उत्पादन घटत गेले. घटीचे नेमके कारण शेतकऱ्यापुढे आले नाही.
आज याबाबत सर्वत्र शेतकरी वर्गात अज्ञान आहे असे नाही. विकसित देशामध्ये ज्या ठिकाणी या सुक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास झाला अनेक शास्त्रज्ञांनी मोठमोठे ग्रंथ प्रकाशित केले त्या युरोप अमेरिकेतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.
प्रताप चिपळूणकरकृषीतज्ज्ञ, कोल्हापूर
हेही वाचा : जमिनीखालील अवशेषाचे झालेले खत पिकांसाठी भारी; अधिक उत्पादनाची बात न्यारी