Join us

बनावट दस्त नोंदणीसाठी रोखण्यासाठी शक्कल; दस्तांवरील आधार, पॅन, बोटांचे ठसे होणार अदृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 4:39 PM

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ऑनलाईन दस्त डाऊनलोड करताना आधार, पॅन व बोटांचे ठसे दिसणार नाहीत अशा स्वरूपाची सुविधा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधार, पॅन व बोटांच्या ठशांचा गैरवापर टाळून बनावट दस्त नोंदणी करता येणार नाही. येत्या महिनाभरात या सुविधेची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

नितीन चौधरीपुणे : मालमत्ता खरेदी तसेच भाडेकरार, लोकमत न्यूज नेटवर्क साठेखत अशा प्रकरणांमध्ये दस्त नोंदणी करताना आधार, पॅन क्रमांक तसेच बोटांचे ठसे घेतले जातात. याच आधार, पॅन व बोटांच्या ठशांचा गैरवापर करून बनावट दस्त नोंदणी होत असल्याचे प्रकार होत असल्याने याचा गैरवापर टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ऑनलाईन दस्त डाऊनलोड करताना आधार, पॅन व बोटांचे ठसे दिसणार नाहीत अशा स्वरूपाची सुविधा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधार, पॅन व बोटांच्या ठशांचा गैरवापर टाळून बनावट दस्त नोंदणी करता येणार नाही. येत्या महिनाभरात या सुविधेची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

मालमत्ता खरेदी, भाडेकरार, साठेखत अशा स्वरूपाच्या दस्त नोंदणीमध्ये खरेदीदार व विक्री करणाऱ्याचे आधार व पॅन क्रमांक तसेच बोटांचे ठसे घेतले जातात. मात्र या आधार, पॅन व बोटांच्या ठशांचा गैरवापर करून पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये बनावट दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले होते. याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला तातडीचे उपाय करण्याचे निर्देश दिले होते.

अधिक वाचा: साठेखत म्हणजे काय? ते करणे का आवश्यक असते

त्यासाठी सर्व दस्तांवरील आधार, पॅन व बोटांचे ठसे अदृश्य करावेत जेणेकरून ही बनावटगिरी टाळता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे केंद्र सरकारने सुचविले होते. राज्यात आतापर्यंत सुमारे चार कोटी दस्त नोंदणीकृत झाले आहेत. मात्र, केंद्र सरकारने सुचविलेले हे सर्व बदल चार कोटी दस्तांमध्ये करणे शक्य नसल्याने त्यावर तोडगा म्हणून दिल्ली येथील राष्ट्रीय माहिती केंद्राने दस्त ऑनलाईन डाउनलोड करताना आधार, पॅन व बोटांचे ठसे मास्क्ड होतील, अर्थात दिसणार नाहीत, अशी सुविधा निर्माण केली आहे. महिनाभरात ही सुविधा राज्यात देखील लागू होईल.

जून-२०२३ पासून राज्यात दस्त तयार करताना बोटांचे ठसे घेतले जातात. मात्र, त्याची प्रत्यक्ष प्रत काढल्यानंतर त्यावर केवळ 'बरोबर'ची खूण दिसून येते. बोटांचे ठसे हे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या डेटामध्ये जतन केले जातात. त्यानुसारच आता आधार व पॅन क्रमांक देखील मास्क्ड होतील, अर्थात शेवटचे चार आकडे व स्टार चिन्ह दर्शविले जातील. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना बनावट दस्त नोंदणी करता येणार नाही. - अभिषेक देशमुख, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे

टॅग्स :महसूल विभागराज्य सरकारआधार कार्डशेतकरीपॅन कार्डपुणे