मालमत्ता विक्रीच्या संदर्भात सगळ्या सहहिस्सेदारांची संमती असेल तर काही प्रश्नच येत नाही, पण प्रश्न तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा मालमत्ता विक्रीस काही वारस विरोध किंवा अडथळा निर्माण करीत असतात.
अशावेळी आपल्याला वाटपाचा दावा दाखल करावा लागतो, पण बऱ्याचदा त्यात प्रश्न येतो, या दाव्यात प्रतिवादी कोणाकोणाला करायचं.
यात प्रमुख गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे जे सहहिस्सेदार वाटपाला तयार नाहीत, त्या प्रत्येकाला दाव्यात प्रतिवादी करावं लागेल.
अनेकजण सात-बारा उताऱ्याच्या आधारे हा निर्णय घेतात, पण हा निर्णय चुकीचा, लांबचा किंवा वेळखाऊ ठरू शकतो.
समजा एखाद्या व्यक्तीचं नाव सात-बारा उताऱ्यावर आहे, म्हणून त्याला प्रतिवादी करायचं, पण एखाद्याचं नाव सात-बारा उताऱ्यावर नसेल तर त्याला प्रतिवादी करायचं नाही का?
सात-बारा उताऱ्यावर नाव असलेला प्रत्येकजण त्या मालमत्तेचा मालक असेलच असं नाही आणि एखाद्याचं नाव सात-बारा उताऱ्यावर नाही, म्हणजे तो त्या मालमत्तेचा मालक किंवा सहहिस्सेदार नाही, असंही नाही.
काही वेळा सात-बारा उतारा अद्ययावत नसतो, म्हणजे त्यात काही व्यक्तींची नावं कमी केलेली नसू शकतात किंवा काही योग्य व्यक्तींची नावं; जी सहहिस्सेदार आहेत, त्यांची नावं चढवलेली नसू शकतात.
अशावेळी जो सहहिस्सेदार आहे, त्याचंच नाव जर प्रतिवादींमध्ये नसेल तर मग दावाच अपूर्ण राहतो. याशिवाय काही सहहिस्सेदार तटस्थ असू शकतात. या साऱ्यांनाच प्रतिवादी करावं लागेल.
त्यासाठी वंशावळीचा आधार घ्यायला हवा आणि त्यानुसार आपल्या दाव्यात त्या साऱ्यांची नावं असायला हवीत. याशिवाय आणखीही बरेच मुद्दे आहेत. योग्य वकिलाची मदत त्यासाठी घेता येईल.
अधिक वाचा: आता प्रत्येक शेताला मिळणार १२ फुटांचा शेतरस्ता; पाणंद रस्त्यांसाठी येणार 'ही' योजना