Join us

Seed Germination Test बियाणांची उगवणक्षमता तपासण्यासाठी गोणपाटाचा वापर का करतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:23 PM

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरत असल्यास बियाणाची उगवण क्षमता तपासूनच बियाणाची पेरणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी घरच्याघरी बियाणांची उगवणक्षमता कशी तपासावी ते पाहू.

बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यात मान्सून पाऊसदेखील काही दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरीपेरणीच्या तयारीस लागला आहे.

मात्र, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरत असल्यास बियाणाची उगवण क्षमता तपासूनच बियाणाची पेरणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी घरच्याघरी बियाणांची उगवणक्षमता कशी तपासावी ते पाहू.

अशी करावी क्षमता तपासणी

  • सुरुवातीला पेरणी करणाऱ्या बियाणातील शंभर बियाणे घेऊन एक गोणपाट ओले करून घ्यायचे.
  • त्यामध्ये दहा ओळी करून हे शंभर बियाणाची मांडणी करावी व ते गोणपाट ओलसर राहील, याची काळजी घ्यावी.
  • त्यानंतर चार ते पाच दिवसांनी शंभर बियाणांपैकी किती उगवले हे तपासावे.
  • यातील समजा सत्तर बियाणे उगवले तर बियाणाची क्षमता सत्तर टक्के, असे समजून पेरणी करताना अधिकचे बियाणे पेरणी करावी.
  • यामध्ये उगवण क्षमता तपासणी केल्यामुळे शेतकऱ्याचे संभाव्य नुकसान टाळता येते.
  • शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केल्यावर त्याची पावती घ्यावी व बी-बियाणाची पेरणी करताना प्रत्येक बॅगमधील काही बियाणे शिल्लक ठेवावे.
  • बॅग फोडताना शक्यतो तळातून कापावी त्यामुळे बियाणाच्या बॅग वरील नंबर कायम राहतात, यामुळे जर बियाणे उगवले नाही तर संबंधित कंपनीवर कार्यवाही करता येते, त्यासाठी शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे प्रक्रिया करूनच पेरणी करावी. एकदल बियाणांसाठी अझोटोबॅकतर व द्विदल पिकासाठीराय झोबियमचा वापर करावा. बियाणाची उगवण क्षमता अगदी घरगुती पद्धतीने तपासणी करून पेरणी केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान टाळता येईल.

अधिक वाचा: सोयाबीनचं घरचं बियाणं पेरताय; अशी करा उगवण क्षमता चाचणी

टॅग्स :शेतकरीशेतीपीकखरीपपाऊसपेरणीमोसमी पाऊस